दुसर्या वर्षी लग्न, १३ व्या वर्षी वैधव्य!
By admin | Published: June 17, 2015 01:33 AM2015-06-17T01:33:08+5:302015-06-17T15:36:20+5:30
राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील सांस गावात गेल्या शुक्रवारी झालेल्या बस अपघाताने सोहनी देवी या निष्पाप बालिकेचे आयुष्य पार उद्ध्वस्त झाले आहे. वयाच्या अवघ्या दुसर्या वर्षी विवाह झालेली सोहनी देवी आज १३ वर्षांची आहे आणि पतीच्या घरी नांदायला जायच्या आधीच या बस अपघाताने तिच्या नशिबी वैधव्य आले.
बस अपघाताने सोहनी देवीचे आयुष्य उद्ध्वस्त
जयपूर : राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील सांस गावात गेल्या शुक्रवारी झालेल्या बस अपघाताने सोहनी देवी या निष्पाप बालिकेचे आयुष्य पार उद्ध्वस्त झाले आहे. वयाच्या अवघ्या दुसर्या वर्षी विवाह झालेली सोहनी देवी आज १३ वर्षांची आहे आणि पतीच्या घरी नांदायला जायच्या आधीच या बस अपघाताने तिच्या नशिबी वैधव्य आले आहे!
शुक्रवारी सांस गावात रस्त्यावरून जाणारी एक बस खाली लोंबणार्या विजेच्या एका जिवंत तारेच्या संपर्कात आली आणि त्यात सोहनी देवीचा १५ वर्षांचा पती सुखीराम गुज्जर याच्यासह १६ प्रवासी भाजून मृत्युमुखी पडले.
ज्या वयात इतर मुले हसत-बागडत शाळेत जातात त्या वयात आपल्यावर कोसळलेल्या या दु:खाची पूर्णांशीने कल्पना येण्याचे खरे तर सोहनी देवीचे वयही नाही. सोहनीचे माहेर चानवाडिया गावातील आहे. बालविवाह झालेली सोहनी देवी इतकी वर्षे माहेरीच राहत आहे. काही वर्षांपूर्वी तिने शाळा सोडली आहे. आता वयात आल्याने काही महिन्यांत तिला रिवाजानुसार पतीच्या घरी पाठविले जायचे होते; पण त्याआधीच नियतीने तिच्यावर हा असा क्रूर घाला घातला आहे.
सध्या सुखीरामच्या क्रियाकर्मांसाठी सोहनी देवीला सासरच्या घरी आणण्यात आले आहे; पण अनोळखी घरात आल्याने तिने रडून आक्रोश चालविला आहे. बस अपघातात जखमी झालेल्या २० प्रवाशांवर येथील एसएमएस इस्पितळात उपचार सुरू आहेत. शेजारच्या बच्छेडा गावाचे सरपंच रामदेव गुज्जर त्यासाठी धावपळ करीत आहेत. सोहनी देवीच्या शोकांतिकेने हृदय पिळवटून गेल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवते. निरागसतेने आक्रोश करणार्या सोहनीकडे बघवत नाही, असे पाणावलेल्या डोळ्यांनी सांगताना रामदेव म्हणाले की, लग्नाच्या दिवशी आई-वडिलांच्या मदतीने अग्निभोवती सात फेरे घेणार्या दोन वर्षांच्या सोहनीची छबी आजही डोळ्यापुढून जात नाही.
सुखीरामनेही दोन-तीन इयत्तांनंतर शाळा सोडली व तो शेतीच्या कामात कुटुंबियांना मदत करायचा.
राजस्थानच्या ग्रामीण भागांत आजही बालविवाहांची कुप्रथा प्रचलित आहे. बस अपघातामुळे सोहनी देवीची शोकांतिका समोर आली; पण ही तिची एकटीची शोकांतिका मात्र नक्कीच नाही, असे बालहक्क संघटनेचे कार्यकर्ते रवी शर्मा यांनी सांगितले.
(वृत्तसंस्था)