बुधवारचा छोटा स्वीडिश शनिवार : लिलोडॉग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 09:16 AM2021-12-28T09:16:29+5:302021-12-28T09:17:00+5:30

बहुतेक सगळे कॉर्पोरेट नोकऱ्या करणारे लोक सॅटर्डे नाईटला छोटी का असे ना पार्टी करतात. मित्र-मैत्रिणी जमवतात. बारमध्ये जातात. हॉटेलमध्ये जातात.

Wednesday's little Swedish Saturday: Lilodog | बुधवारचा छोटा स्वीडिश शनिवार : लिलोडॉग

बुधवारचा छोटा स्वीडिश शनिवार : लिलोडॉग

Next

लिलोडॉग असा एक स्वीडिश शब्द आहे. म्हणजे खरं तर दोन शब्द जोडून तयार झालेला तो एक तिसराच शब्द आहे. लिल आणि लॉर्डा हे ते दोन शब्द. त्यापैकी लिल हा शब्द जरी स्वीडिश असला तरी इंग्लिश येणाऱ्यांना संदर्भाने त्याचा अर्थ कळतो. लिल म्हणजे स्मॉल किंवा लहान. लॉर्डा म्हणजे शनिवार. आता लिल आणि लॉर्डा मिळून लिलोडॉग हा शब्द कसा काय तयार होतो हे विचारण्यात काही अर्थ नाही. कारण स्वीडिश भाषेचे संधी आणि समासाचे नियम आपल्याला माहिती नाहीत; पण लिलोडॉग या शब्दातील व्याकरणातील संधी महत्त्वाची नसून त्या शब्दाने स्वीडिश लोकांना आयुष्यात जी संधी मिळते ती महत्त्वाची आहे. लिलोडॉग म्हणजे छोटा शनिवार!

आता शनिवार या शब्दाचं महत्त्व नोकरी करणाऱ्याला जितकं कळतं तितकं कोणालाच कळू शकत नाही. त्यातही मनाविरुद्ध नोकरी करणारे किंवा नोकरीच्या ठिकाणचं वातावरण गढूळ असतानाही परिस्थितीमुळे ती नोकरी टिकवून ठेवणारे, मुलांना शाळेत किंवा पाळणाघरात दिवस दिवस सोडून नोकरी करणारे असे सगळेच जण आतुरतेने दर आठवड्यात शनिवारची वाट बघत असतात. कारण आठवडाभर सतत तणावाखाली, डेडलाइन्सचं प्रेशर घेऊन काम करणाऱ्यांसाठी सॅटर्डे नाईट ही अनवाइंड होण्याची वेळ असते.

बहुतेक सगळे कॉर्पोरेट नोकऱ्या करणारे लोक सॅटर्डे नाईटला छोटी का असे ना पार्टी करतात. मित्र-मैत्रिणी जमवतात. बारमध्ये जातात. हॉटेलमध्ये जातात. उशिरापर्यंत जागतात आणि नोकरी सोडून इतर कुठल्याही विषयांवर गप्पा मारतात. त्यांच्या आवडीचे सिनेमे बघतात, वेब सिरीज बघतात. त्या एका शनिवारच्या रात्री हे लोक अक्षरशः आठवडाभराचं राहिलेलं जगून घेतात. रविवारी उशिरा उठतात. कारण सोमवारी पुन्हा घड्याळाच्या काट्यावर नाचावं लागणार असतं.

ज्यांचं रुटीन असं असतं त्यांना बुधवार हा आठवड्यातला सगळ्यात खतरनाक वार आहे,  हे माहिती असतं. कारण आठवडा सुरू होऊन तीन दिवस झालेले असल्याने बुधवारी संध्याकाळी तुमची आठवड्याची ऊर्जा बरीच खर्च झालेली असते आणि अजून दोन किंवा तीन दिवसांचं काम बाकी असतं. त्यानंतर शनिवार येणार असतो. त्यातही पुरुषांपेक्षा बायकांना हा ताण जास्त जाणवतो. कारण पुरुषांना बहुतेक वेळा वीकेंडला त्यांच्या मनाप्रमाणे वेळ घालवता येतो. मित्र भेटतात; पण बायकांचा मात्र तो वेळ बहुधा घरातली कामं किंवा मुलांना वेळ देणं यात खर्च होतो आणि मग त्यांना स्वतःसाठी अजिबातच वेळ मिळत नाही. 

ज्या लोकांना कुठल्याही कारणाने रिलॅक्स होण्यासाठी शनिवारची वाट बघणं शक्य नसतं असे स्वीडिश लोक लिलोडॉगचा आधार घेतात. आठवड्यातला कुठलाही दिवस लिलोडॉग असू शकतो, पण बहुतेक वेळा तो बुधवारच असतो. लिलोडॉग म्हणजे काय? तर सॅटर्डे नाईटला आपण जे काही करतो तेच, पण कमी प्रमाणात करायचं. किती झालं तरी गुरुवारी गजर वाजला की उठून ऑफिस गाठायचं असल्यामुळे निवांत पार्टी करणं तर काही बुधवारी शक्य होत नाही; पण मग निदान काही कामांना सुटी द्यायची आणि बुधवारची रात्र थोडीफार एन्जॉय करायची.

जेवण बाहेरून मागवायचं. पाहिजे तर जेवणानंतर केक किंवा आइस्क्रीम असलं काही तरी गोड खायचं. एखादा सिनेमा बघायचा. वेबसिरीजचे दोन-तीन एपिसोडस् बघायचे. बुधवारी ऑफिस संपल्यानंतर गुरुवार सकाळ उजाडेपर्यंत बेसिकली रिलॅक्स व्हायचं. आठवडाभराचा ताण साचू द्यायचा नाही. बुधवारी किंवा आठवड्यातल्या मधल्याच एखाद्या वारी त्याचा थोडा तरी निचरा करून टाकायचा. म्हणजे लिलोडॉग! ही आयडिया अशी आहे की ती कोणीही वापरावी, स्वतःच्या सोयीने वापरावी आणि कामाचा ताण फार वाढण्याच्या आधीच कमी करून टाकावा.

अर्थात लिलोडॉग ही कल्पना जरी स्वीडिश असली तरी सगळे स्वीडिश लोक ती वापरतात असं नाही; पण स्टोकहोममध्ये राहणाऱ्या अनिथा क्लेमेन्स आणि ऍन सॉडरलंड या दोघींनी कोरोना लॉकडाऊनच्या काळात ही संकल्पना फारच उचलून धरली. त्या दोघी त्यांच्या त्यांच्या घरी बुधवारी छोटासा शनिवार साजरा करतातच; पण त्या दोघी मिळून गेल्या सहा वर्षांपासून ‘लिल लॉर्डा’ नावाचा एक पॉडकास्ट चालवतात. तो दर बुधवारी प्रसारित करतात. त्यांचा पॉडकास्ट हा स्वीडनमधील ५० सर्वांत लोकप्रिय पॉडकास्टस्पैकी एक आहे. त्यांच्या पॉडकास्टमध्ये त्या एरवी बोलले न जाणारे विषय चर्चेला घेतात. त्यात नातेसंबंध, मातृत्व, जीवनशैली अशा नेहमीच्या वाटणाऱ्या विषयांमधले एरवी बोलले न जाणारे पैलू घेऊन त्यावर चर्चा करतात. त्या दोघी म्हणतात की छोट्या शनिवार इतकं महत्त्वाचं आणि पवित्र दुसरं काहीही नाही. 

अधलीमधली फुरसत
स्वीडन या देशातले लोक आनंदी मानले जातात, कारण ते खरोखरच तसे असतात आणि आनंदी राहण्यासाठी हा देश अखंड प्रयत्नही करीत असतो. दर आठवड्याच्या मध्येच येणारा हा छोटा स्वीडिश वीकेंड महत्त्वाचा आहे तो म्हणूनच!

Web Title: Wednesday's little Swedish Saturday: Lilodog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.