श्रावणापूर्वी चिकन खाण्यासाठी मागितली आठवडाभराची रजा
By admin | Published: June 21, 2017 01:48 AM2017-06-21T01:48:39+5:302017-06-21T01:48:39+5:30
आल्हाददायक वातावरणामुळे श्रावणाची सर्वांना प्रतीक्षा असते. मात्र, एक रेल्वे कर्मचारी श्रावण जवळ आल्यामुळे चिंतेत आहे.
नवी दिल्ली : आल्हाददायक वातावरणामुळे श्रावणाची सर्वांना प्रतीक्षा असते. मात्र, एक रेल्वे कर्मचारी श्रावण जवळ आल्यामुळे चिंतेत आहे. ही चिंता अर्थातच चिकन न खाता येण्याची आहे. श्रावणाचा पूर्ण महिना मांसाहार करता येणार नसल्यामुळे या पठ्ठ्याने मांसाहारासाठी एक आठवड्याची सुट्टी मागितली आहे. त्याने रजेच्या अर्जात चिकन खाण्यासाठी एक आठवड्याची रजा मिळावी, असा उल्लेख केला आहे. ही गंमतीची घटना छत्तीसगडच्या दीपका रेल्वे साइडिंग येथील आहे. येथे ग्रेड टीए-२ (पोर्टर) पदावर कार्यरत रेल्वे कर्मचारी पंकज राज गौड यांनी स्टेशन मास्तर शाम बारगे यांची १५ जून रोजी भेट घेऊन काही दिवसांची सुट्टी मागितली. तेव्हा स्टेशन मास्तरांनी रजेवरील लोक परतल्यानंतर तुम्हाला सुट्टी मिळेल, असे गौड यांना सांगितले. त्यांनी गौड यांची मागणी गांभीर्याने घेतली नाही. मात्र, १७ जून रोजी गौड यांचा रजेचा अर्ज समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली. रजेच्या अर्जात पंकज यांनी म्हटले होते की, मी पंकज गौड दीपका रेल्वे साइडिंगमध्ये कार्यरत आहे. महोदयांना हात जोडून नम्र विनंती करतो की, पुढील महिन्यापासून श्रावण महिना सुरू होत आहे. त्यामुळे घरी चिकन शिजणार नाही. चिकन खाल्ले नाही तर दुर्बलता येईल आणि मी २४ तास काम करू शकणार नाही. त्यामुळे महोदयांना नम्र विनंती आहे की, मला चिकन खाण्यासाठी २० पासून २७ जूनपर्यंत सुट्टी देण्याची कृपा करावी. सात दिवसांत मुबलक चिकन खाऊन मी महिनाभराची गरज भागवेन. पोलीस कर्मचाऱ्यांप्रमाणेच रेल्वे कर्मचाऱ्यांच्या नोकरीची वेळही २४ तासांची असते. समाज माध्यमावर व्हायरल झालेल्या या रजेच्या अर्जावर स्टेशन मास्तरांची स्वाक्षरी आणि शिक्का आहे. स्टेशन मास्तरांनी चिकन खाण्यासाठी एक आठवड्याची रजा मंजूर केली, असा याचा अर्थ होतो. हा अर्ज मोठ्या प्रमाणात शेअर होत असून, त्यावर कमेंटस्ही मोठ्या प्रमाणात केल्या जात आहेत. रेल्वे व्यवस्थापन असा अर्ज मिळाला नसल्याचे सांगून अंग झटकत आहे. मात्र, हा अर्ज वेगाने व्हायरल होत असल्यामुळे अधिकारी हैराण आहेत. रेल्वे कर्मचारी पंकज रायवर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते, असे मानले जाते.