कोरोनाची दहशत! हेल्पलाइनवर तक्रार...'डॉक्टर, पत्नी रोज ५०० लिटर पाण्याची टाकी रिकामी करते'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 12:17 PM2020-07-20T12:17:53+5:302020-07-20T12:18:01+5:30
या व्यक्तीने सांगितले की, कोरोना व्हायरसच्या भीतीने त्याची पत्नी अशी विचित्र वागू लागली आहे. शेजाऱ्यांनी जेव्हा त्याच्याकडे याबाबत तक्रार केली तेव्हा तो हेल्पलाइन नंबरवर पत्नीची तक्रार करण्यास मजबूर झाला.
वेगवेगळ्या हेल्पलाइन नंबरवर लोक त्यांच्या वेगवेगळ्या समस्या सांगत असतात. यातील काही समस्या अशा असतात ज्यावर हसावं की रडावं हेच कळत नाही. अशीच तक्रार अहमदाबादच्या सरकारी टेलिमेडिसिन हेल्पलाइन नंबर ११०० वर एका व्यक्तीने केली. एका घाबरलेल्या व्यक्तीने तक्रार केली होती की, त्याची पत्नी आजकाल फार जास्त पाणी वापरते. त्याने सांगितले की, त्याची पत्नी दिवसाला ५०० लिटर पाण्याची टाकी रिकामी करते. इतकेच नाही तर ती तीनदा पूर्ण घर धुते. कपाट, टेबल स्टोरेज आणि शू रॅकही ती पुन्हा पुन्हा धुते.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या व्यक्तीने सांगितले की, कोरोना व्हायरसच्या भीतीने त्याची पत्नी अशी विचित्र वागू लागली आहे. शेजाऱ्यांनी जेव्हा त्याच्याकडे याबाबत तक्रार केली तेव्हा तो हेल्पलाइन नंबरवर पत्नीची तक्रार करण्यास मजबूर झाला. हेल्पलाइनशी संबंधित मानसोपचार तज्ज्ञ रमाशंकर यादव यांनी सांगितले की, फोन केला तेव्हा व्यक्तीचा स्वत:वर अजिबात कंट्रोल नव्हता. त्याची पत्नी कुणालाही घरात येऊ देत नव्हती. त्यालाही कठोर नियमांसोबत घराबाहेर पडावं लागत होतं. शेजाऱ्याला भेटायला गेला तरी घरी आल्यावर पत्नीच्या मर्जीने त्याला आंघोळ करावी लागत होती.
डॉक्टरांनी सांगितले की, ही काही सामान्य घटना नाही. तर महिलेमध्ये एक ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव डिसऑर्डरची लक्षणे दिसत आहेत. कोरोना महामारी दरम्यान अशा मानसिक स्थितीतून जाणारी ती एकटी नाही. अनेक राज्यांमध्ये अशा केसेस बघायला मिळत आहेत.
२४ तास मास्क
राज्य सरकारने मे महिन्याच्या मध्यात ११०० मेडिसिन हेल्पलाइन सुरू केली होती. तेव्हापासून हेल्पलाइनवर १२ हजारपेक्षा अधिक लोकांनी हेल्पलाइनवर फोन करून सल्ला घेतला. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हंसल यांनी सांगितले की, एक व्यक्ती तर कोरोनाला इतका घाबरला होता की, १५ दिवस तो प्रत्येक क्षणी मास्क तोंडाला लावून राहत होता. इतकेच काय तर झोपताना आणि आंघोळ करतानाही तो मास्क लावत होता.
घरात पीपीई किट
हंसल यांनी सांगितले की, ५० वर्षाच्या एका व्यक्तीला असं माहीत होतं की कोरोना व्हायरस हवेच्या माध्यमातून पसरतो. त्यामुळे त्याने स्टॉप मास्क लावण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सांगितले की, अशीच एक ४० वर्षीय बिझनेसमनची पत्नी तक्रार करत होती की जेव्हापासून सोसायटीमध्ये एका कोरोना रूग्ण सापडला. तेव्हा पती घरात सतत पीपीई कीट घालून राहतात. त्या व्यक्तीने सांगितले की, घरात तो एकटाच कमावणारा आहे त्यामुळे कोरोनाची रिस्क घेऊ शकत नाही.
रोज दोन लिटर सॅनिटायजर
डॉक्टरांनी सांगितले की, अशीच एक महिला रोज दोन लिटर सॅनिटायजर आपल्या हातांवर लावून संपवते. ती हे तिची त्वचा फाटत नाही तोपर्यंत करत राहिली. कोरोना काळात पुन्हा पुन्हा हात धुण्याचा सल्ला दिला जातो. पण काही लोक अति करतात. या काळात लोकांना आता सुरक्षित उपायांच्या वापराबाबत काउन्सेलिंगची गरज आहे.