सलमान तुरुंगात जाण्याने आम्हाला काय मिळणार?
By admin | Published: May 7, 2015 01:57 AM2015-05-07T01:57:23+5:302015-05-07T01:57:23+5:30
सलमान खानला शिक्षा होऊनही २००२च्या हिट अॅण्ड रन घटनेत मृत्यू पावलेल्याच्या कुटुंबीयांचे अथवा जखमींचे समाधान झालेले नाही.
भरपाई महत्त्वाची : हिट अॅण्ड रन’मधील पीडितांची प्रतिक्रिया
मुंबई - बॉलीवूड अभिनेता सलमान खान याला २००२च्या ‘हिट अॅण्ड रन’ खटल्यात सदोष मनुष्यवधासाठी पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाली खरी, परंतु त्याने या घटनेत मृत्यू पावलेल्याच्या कुटुंबीयांचे अथवा जखमींचे समाधान झालेले नाही. सलमान खानला होणाऱ्या शिक्षेहून आमच्यासाठी नुकसानभरपाई मिळणे महत्त्वाचे आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
२८ सप्टेंबर २००२ च्या रात्री सलमान खानची लॅण्ड क्रुझर वांद्रे येथील अमेरिकन बेकरीच्या बाहेर फूटपाथवर झोपलेल्यांच्या अंगावर आली, तेव्हा तिच्याखाली चिरडून नुरुल्ला मेहबूब शरीफ याचा मृत्यू झाला होता. याखेरीज कलीम मोहंमद, मुन्ना मलाई खान, अब्दुल्ला रऊफ आणि मुरानी शेख हे चौघे जखमी झाले होते.
सलमानच्या शिक्षेवर प्रतिक्रिया देताना मयत नुरुल्ला मेहबूब शेख याची पत्नी म्हणाली, की आम्हाला १० लाख रुपये नुकसानभरपाई मिळेल असे सांगण्यात आले; पण या महागाईच्या दिवसांत ही रक्कम किती दिवस पुरणार? त्यापेक्षा माझ्या मुलाला नोकरी मिळाली तर माझा फायदा होईल.
या अपघातात पाय गमावलेला अब्दुल्ला रऊफ शेख म्हणतो, की गेल्या १३ वर्षांत मला भेटण्यासाठी कोणीही आले नाही. व्यवसायाने मजूर असणाऱ्या अब्दुल्लाने किरकोळ कामे करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवला. मला खूप कष्ट व हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. पण तरीही माझ्या मनात सलमानबद्दल कटू भावना नाहीत. मी अजूनही त्याचे चित्रपट पाहतो. कोणीही आमच्यावर दबाव आणलेला नाही, हेही त्याने कबूल केले.
कोणत्याही इतर बाबींपेक्षा आमच्या दृष्टीने नुकसानभरपाई महत्त्वाची आहे़ या अपघाताने माझे आरोग्य व काम यावर परिणाम झाला आहे, असे शेख याने सांगितले. सलमानला शिक्षा झाली तरी मला काही फायदा होण्यासारखा नाही, माझा पाय परत मिळण्यासारखा नाही, तसेच माझ्या समस्याही कमी होण्यासारख्या नाहीत. पण नुकसानभरपाई पुरेशी मिळाली तर आम्हाला कोणतीही समस्या राहणार नाही, असे शेख म्हणाला. अपघात झाला तेव्हा मी २२ वर्षांचा होतो, असेही त्याने सांगितले. (प्रतिनिधी)