औषधांच्या पॅकेटवर लाल रंगाची रेष का असते? 99 टक्के लोकांना माहीत नसतो याचा अर्थ!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 03:22 PM2024-09-17T15:22:49+5:302024-09-17T15:23:25+5:30
अनेक पॅकेट्सवर महत्वाची माहिती दिलेली असते किंवा काही सूचना दिलेल्या असतात.
Interesting Facts : आजारी पडले की, सगळ्यांनाच औषधं घ्यावी लागतात. डॉक्टरही भरपूर औषधं लिहून देतात. अशात मेडिकलमधून गोळ्यांची म्हणजे औषधांची अनेक पॅकेट्स आणली जातात. पण खरंच लोक या पॅकेट्सकडे नीट बघतात का किंवा त्यावरील माहिती वाचतात का? हा प्रश्न आहे. कारण अनेक पॅकेट्सवर महत्वाची माहिती दिलेली असते किंवा काही सूचना दिलेल्या असतात. काही पॅकेट्सवर लाल रंगाची रेष असते. त्याचं कारण हे आज आम्ही सांगणार आहोत.
तुम्हीही अनेकदा पाहिलं असेल की, काही गोळ्यांच्या स्ट्रीपवर लाल रंगाची एक रेष असते. ही का असते आणि याचा अर्थ काय असते अनेकांना माहीत नसतं. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कारण हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे.
लाल रंगाची रेष
लाल रंगाच्या या रेषेबाबत डॉक्टरांना चांगलं माहीत असतं. पण सर्वसामान्य लोकांना याची काहीच माहिती नसते. अशात लोक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतंही औषध मेडिकलमधून घेतात आणि नंतर त्यांना समस्येचा सामना करावा लागतो. त्यामुळे औषधांची खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते.
काय आहे या रेषेचा अर्थ?
गोळ्यांच्या स्ट्रीपवर असलेल्या लाल रंगाच्या रेषेचा अर्थ असा होतो की, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ना हे औषध विकलं जाऊ शकत ना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय याचा वापर करता येत. अॅंटी-बायोटिक औषधांचा चुकीच्या पद्धतीने होणारा वापर रोखण्यासाठी गोळ्यांच्या स्ट्रीपवर ही लाल रंगाची रेष काढलेली असते.
लाल रंगाच्या रेषेशिवाय औषधांच्या स्ट्रीपवर आणखीही बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या असतात. ज्यांबाबत तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. काही गोळ्यांच्या पाकिटांवर Rx असं लिहिलेलं असतं, ज्याचा अर्थ असा होतो की, हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावं.
NRx चा अर्थ?
तर औषधांच्या ज्या पाकिटांवर NRx लिहिलेलं असतं. त्याचा अर्थ असा होतो की, हे औषध घेण्याचा सल्ला फक्त तेच डॉक्टर देऊ शकतात ज्यांना नशेच्या औषधांचं लायसन्स असतं.
काही औषधांच्या पाकिटांवर XRx लिहिलेलं असतं आणि याचा अर्थ होतो की, हे औषध केवळ डॉक्टरांकडूनच घेतलं जाऊ शकतं. हे औषध डॉक्टर थेट रूग्णांना देऊ शकतात. रूग्ण हे औषध कोणत्याही मेडिकल स्टोरमध्ये खरेदी करू शकत नाहीत. भलेही डॉक्टरांनी चिठ्ठी लिहून दिली असेल.