स्वप्नात नेमके ‘काय’ दिसते? संशोधनातून समोर आली अशी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 06:04 AM2021-10-15T06:04:19+5:302021-10-15T06:04:47+5:30

सर्वसामान्य लोकांना स्वप्न कुठल्या प्रकारची असतात?,  त्यात कुठल्या भावना असतात?, ह्या प्रश्नांचे उत्तर मिळवण्याकरता संशोधन झाले आहे.  

What exactly does a dream look like? | स्वप्नात नेमके ‘काय’ दिसते? संशोधनातून समोर आली अशी माहिती

स्वप्नात नेमके ‘काय’ दिसते? संशोधनातून समोर आली अशी माहिती

googlenewsNext

सर्वसामान्य लोकांना स्वप्न कुठल्या प्रकारची असतात?,  त्यात कुठल्या भावना असतात?, ह्या प्रश्नांचे उत्तर मिळवण्याकरता संशोधन झाले आहे.  पहिल्या गटामध्ये लोकांना स्लिप लॅब मध्ये रेम झोपेतून उठवले जाते आणि कुठली स्वप्ने पडली होती याचा अभ्यास केला जातो. तर, दुसऱ्या गटात घरी झोप झाल्यानंतर सकाळी स्वप्ने लिहून काढणारे लोक असतात. स्लिप लॅब मधला  अभ्यास स्नायडर या संशोधकाने १९६० ते १९६७ या सात वर्षाच्या दरम्यान केला होता. यात ६३५ स्वप्नांचा रिपोर्ट घेतला होता. बहुतांश लोकांची  स्वप्नांच्या आशयाबद्दलची जी समजूत असते त्यापेक्षा वेगळाच निष्कर्ष निघाला. परीक्षेत नापास झालो आहोत,  पब्लिकमध्ये अर्धनग्न अथवा उघडे आहोत, अचानक दात नाहीसे झाले आहेत, पैसे सापडणे, आकाशातून खाली पडणे... अशा प्रकारची स्वप्ने फक्त ११ टक्के लोकांनाच पडली. बरीचशी स्वप्ने ही आदल्या दिवसामध्ये घडलेल्या घटनांची तंतोतंत उजळणी होती.

स्वप्नांमध्ये असलेल्या भावनांचा अभ्यास बेथेस्डा ब्रुकलीन इथल्या स्लिप लॅबमध्ये करण्यात आला.  या अभ्यासात बऱ्याचशा स्वप्नांमध्ये भावना (राग, हर्ष, उत्कंठा इ.) या यथोचित होत्या. सर्वात जास्त आढळलेला दोष म्हणजे भावनांचा अभाव.  नकारात्मक भावना (राग, द्वेष,  मत्सर) या सकारात्मक भावनांपेक्षा ( आदर,  प्रेम) दुपटीने आढळल्या.

रेम झोपेप्रमाणेच नॉन रेम झोपेत देखील स्वप्ने पडतात. ही स्वप्ने झोपेच्या उत्तरार्धात आणखी गडद होत जातात. कॉलीन्स या मानसशास्त्रज्ञाने १८९३ साली त्याच्या स्वत:च्या सहकाऱ्यांच्या स्वप्नांचा अभ्यास केला. त्यानुसार स्वप्नांच्या १० निकषांवर आधारित कोडिंग व्यवस्था निर्माण करण्यात आली. स्वप्नांमधील व्यक्ती;  हालचाली,  तीव्रता, आकार इत्यादी बाबीची काटेकोर नोंदणी आणि त्यांचे मूल्यांकन या पद्धतीत होते. त्यातून वेगवेगळ्या  व्यक्ती समूहांचा  (मग, त्या व्यक्ती भारतातल्या असोत किंवा आफ्रिकेतील असो) स्वप्नांच्या अभ्यासात एकसूत्रता आली.

काही संशोधकांनी नाईटकॅप नावाचे तंत्रज्ञान वापरले. घरी झोपले असताना डोळ्यांच्या हालचाली आणि डोक्याची स्थिरता याची माहिती लॅपटॉपकडे जाते.  रेम स्लिप आली की, भोंगा वाजतो आणि स्वप्नांतून उठवले जाते. घरात पडलेली स्वप्ने आणि स्लिप लॅबमधील स्वप्ने यात फारसा फरक दिसत नाही.
- डॉ. अभिजित देशपांडे 
इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्लीप सायन्सेस 
iissreports@gmail.com

Web Title: What exactly does a dream look like?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.