तिरूपती बालाजी मंदिरात दान केलेल्या ५०० ते ६०० टन केसांचं काय केलं जातं? वाचून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 11:41 AM2024-09-21T11:41:29+5:302024-09-21T11:42:13+5:30
तिरूपती बालाजी मंदिरात केस का दान केले जातात आणि त्या केसांचं पुढे काय होतं, हे आज आपण जाणून घेणार आहोत.
सध्या तिरूपती बालाजी मंदिरातील प्रसादाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. तिरूपती बालाजी हे मंदिर देशातील सगळ्यात श्रीमंत मंदिर मानलं जातं. आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यात हे मंदिर आहे. हजारो भक्त रोज या मंदिरात भगवान श्री हरि विष्णूच्या श्री व्यंकटेश्वर रूपाचं दर्शन घेतात. दरवर्षी लाखो भाविक या मंदिराला भेट देतात आणि दानही करतात.
तिरूपती बालाजी मंदिरात भक्तांनी केस दान करण्यालाही खूप महत्व आहे. अशात इथे केस का दान केले जातात आणि त्या केसांचं पुढे काय होतं, हे आज आपण जाणून घेणार आहोत.
केस का दान केले जातात?
तिरूपती बालाजी मंदिरात केस दान करण्याची प्रथा फार प्रचलित आहे. अशी मान्यता आहे की, केस व्यक्तीचा फार महत्वाचा भाग असतात. त्यामुळे जर एखादी व्यक्ती या मंदिरात केस दान करत असेल तर श्री व्यंकटेश्ववर तेवढाच लाभ भक्ताला देतात. दुसरी एक अशीही मान्यता आहे की, जे लोक इथे येऊन केस दान करतात, ज्यांच्या जीवनातील सगळ्यात वाईट गोष्टी आणि नकारात्मकता दूर होते. सोबतच त्यांच्या देवी लक्ष्मीची कृपाही राहते.
केसांचा केला जातो लिलाव?
इंडिया टुडेच्या एका रिपोर्टनुसार, २०१८ मध्ये तिरूपती बालाजी मंदिरात दान करण्यात आलेल्या केसांच्या लिलावातून मंदिराची मासिक कमाई जवळपास ६.३९ कोटी रूपये झाली होती. तिरूमाला तिरूपती देवस्थानम ट्रस्ट हा लिलाव दरवर्षाच्या पहिल्या गुरूवारी करते.
एका डेटानुसार, २०१८ मध्ये वेगवेगळ्या श्रेणीतील जवळपास १,८७,००० किलोग्रॅम केस विकण्यात आले होते. ज्यात १०,००० किलोग्रॅम सगळ्यात चांगल्या क्वालिटीची होते. हे केस ६०० किलोग्रॅम केस २२, ४९४ रूपये प्रति किलोने विकण्यात आले होते. ज्यातून एकूण १.३५ कोटी रूपये कमाई झाली.
केसांचं काय केलं जातं?
तिरूपती बालाजी मंदिरात दरवर्षी लाखो लोक केस दान करतात. हे केस नंतर पाण्यात उकडले जातात, धुतले जातात आणि सुकवले जातात. योग्य तापमानावर ते स्टोर केले जातात. नंतर केस ई-लिलावाद्वारे विकले जातात. यूरोप, अमेरिका, चीन, आफ्रिका अनेक ठिकाणी या केसांना खूप मागणी असते. या केसांचा लिलाव करून मंदिर दरवर्षी कोट्यावधी रूपयांची कमाई करतं.