हॉटेलमध्ये शिल्लक राहिलेल्या साबणांचं पुढे काय होतं? वाचून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 04:58 PM2023-11-03T16:58:13+5:302023-11-03T16:59:25+5:30
हॉटेल्सकडून देण्यात आलेल्या शाम्पू आणि साबणाचा वापर तसा फार काही कुणी करत नाही. चार-पाच दिवसात काही साबण संपत नाही.
बाहेरगावी फिरायला गेल्यावर लोकांना सामान्यपणे हॉटेल्समध्ये थांबावं लागतं. काही हॉटेल्समध्ये फारच चांगल्या सुविधा असतात. इथे लोकांना टूथपेस्टपासून ते साबणापर्यंत सगळं दिलं जातं. काही हॉटेल्स तर असे असतात की, रोज शाम्पू आणि साबणही नवीन दिला जातो. लोक दोन ते पाच दिवस राहतात. अशात पाच दिवसात त्यांनी दिलेला साबण संपत नाही. मग या साबणाचं नेमकं होतं काय? हे आज आपण जाणून घेणार आहोत.
हॉटेल्सकडून देण्यात आलेल्या शाम्पू आणि साबणाचा वापर तसा फार काही कुणी करत नाही. चार-पाच दिवसात काही साबण संपत नाही. अशात त्या उरलेल्या साबणाचं नंतर काय होतं? असा प्रश्न तुम्हालाही कधीना कधी पडला असेलच. त्याचंच उत्तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
ज्या वस्तूंचा आपण वापर करत नाही आणि ज्या वस्तू पॅक्ड असतात त्या अनेकजण आपल्या जवळच्या लोकांना किंवा नातेवाईकांना देतात. पण एका रिपोर्टनुसार, हॉटेलमधील या वस्तू कचऱ्याच्या डब्यात टाकल्या जात नाहीत. हॉटेलमधील या वस्तू गरीबांची स्वच्छतेची समस्या सोडवण्यासाठी उपयोगात आणल्या जातात.
म्हणजे हॉटेलमधील वापरलेल्या साबण अशा गरीब लोकांना दिल्या जातात जे लोक ते खरेदी करू शकत नाहीत वा जे लोक प्रदूषणामुळे वेगवेगळ्या आजारांनी पीडित आहेत. २००० साली काही संस्थांनी यावर चर्चा केली होती.
रिपोर्टनुसार दररोज हॉटेल्सच्या रूममधून हजारो वस्तू घेतल्या जातात. ज्यांपासून गरीबांना फायदा होतो. क्लीन द वर्ल्ड आणि जगातील काही इतर संस्थांनी एकत्र येऊन ही समस्या दूर करण्यासाठी ग्लोबल सोप प्रोजेक्ट नावाचं एक संयुक्त अभियान सुरू केलं आहे.
या अंतर्गत हॉटेलमधून घेण्यात आलेल्या साबणांचा वापर नवीन साबण तयार करण्यासाठी केला जातो. नंतर या वस्तू वेगवेगळ्या गरीब देशांमध्ये पाठवल्या जातात. या देशात राहणारे गरीब लोकही या अभियानाचा लाभ घेतात. यासाठी अनेक संस्था काम करतात. हे लोक हॉटेल्समधून वेगवेगळ्या वस्तू मिळवतात आणि त्या स्वच्छ करून, पुर्ननिर्माण करून गरीबांमध्ये वाटतात. त्यांची शुद्धताही तपासली जाते. त्याशिवाय ते कुणाला दिले जात नाहीत.