हरणांच्या पोटात असणारी कस्तुरी काय असते? का मिळते बाजारात त्याला इतकी किंमत?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 03:44 PM2024-04-01T15:44:33+5:302024-04-01T15:44:56+5:30
महत्वाची बाब म्हणजे कस्तुरी केवळ नर हरणामध्येच असते. मादा हरणात नसते. एका हरणामधून साधारण 25 ते 50 ग्रॅम कस्तुरी मिळते.
हरणामध्ये आढळणारी कस्तूरी नेहमीच लोकांसाठी आकर्षण राहिली आहे. अनेक कविता, गझलमध्ये कस्तुरीचा उल्लेख आढळतो. पण ही कस्तुरी कोणत्या कामात येत आणि याला जगात इतकी किंमत का मिळते हे अनेकांना माहीत नसतं. आज याच कस्तुरीबाबत आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत.
कस्तुरी हरणाच्या नाभिजवळ असलेली एक पिशवी असते. दिसायला ती अंडाकार 3-7.5 सेंटीमीटर लांब आणि 2.5-5 सेंटीमीटर रूंद असते. याचा सुगंध हरणाला वेड लावतं आणि त्याला माहीत नसतं की, हा सुगंध कुठून येत आहे. ते याच सुगंधाचा शोध घेत फिरत असतं.
महत्वाची बाब म्हणजे कस्तुरी केवळ नर हरणामध्येच असते. मादा हरणात नसते. एका हरणामधून साधारण 25 ते 50 ग्रॅम कस्तुरी मिळते. याच कारणाने हरणांची मोठी शिकार केली जाते. कस्तुरी मृगला 'हिमालयन मस्क डियर' नावानेही ओळखलं जातं.
कस्तुरीला जगभरात मौल्यवान सुगंधित पदार्थ मानलं जातं. जुन्या काळात सर्दी, निमोनिया याच्या सुगंधाने ठीक होत असल्याचं दावा केला जात होता. पण याचा सुगंध घेतल्याने नाकातून रक्तही येतं. कस्तुरीचा वापर खाद्य पदार्थांची टेस्ट वाढवण्यासाठीही केला जातो. तसेच याचा वापर परफ्यूम बनवण्यासाठीही केला जातो.
कस्तुरी एका ग्रंथीमध्ये मिळते. आता जगभरात याचा वापर किंवा व्यापर बेकायदेशीर झाला आहे. कारण यामुळे हरणांची शिकार वाढली होती.
एका माहितीनुसार, 19व्या शतकाच्या शेवटपर्यंत कस्तुरीचा अत्तर म्हणून मोठा वापर केला जात होता. आता या कृत्रिमपणेही तयार केलं जात आहे. याच्या वापराने चीनमध्ये पारंपारिक औषधही तयार केलं जातं. कस्तुरी हरीण नेपाळ, भारत, पाकिस्तान, तिबेट, चीन, सायबेरिया आणि मंगोलियामध्ये आढळतात.
कस्तुरी हरीण हे दिसायला भुरक्या रंगाच असतात. त्यांच्या भुरक्या रंगावर रंगीत ठिपके असतात. त्यांना शिंग नसतात. तसेच नराची कसे नसलेली शेपटी असते. यांचे मागचे पाय समोरच्या पायांच्या तुलनेत लांब असतात.
हे जीव फार दूरचा आवाजही ऐकू शकतात. त्यांच्या शरीराच्या रंगात विविधता आढळते. पोट आणि कंबरेचा खालचा भाग पांढरा असतो. तसेच शरीराचा बाकी भाग भुरक्या रंगाचा असतो.