प्लेबॉय या अॅडल्ट मॅगेझिनमध्ये भारताचे पंतप्रधान झळकतात तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2017 12:31 PM2017-10-05T12:31:13+5:302017-10-05T12:45:39+5:30
तुम्हाला वाचून धक्का बसेल की प्लेबॉयच्या वादग्रस्त पानांमध्ये झळकण्याचा पहिला मान मिळवणाऱ्या देशाचे प्रमुखांमध्ये कॅस्ट्रोही नव्हते वा कार्टरही नव्हते, ते होते भारताचे पंतप्रधान...
प्लेबॉय या अॅडल्ट मॅगेझिनचे संस्थापक ह्युग हेफनर यांचे वयाच्या 91व्या वर्षी नुकतंच निधन झालं. नग्न व अर्धनग्न ललनांचे फोटो प्लेबॉयचं दीर्घकाळ राहिलेलं वैशिष्ट्य. परंतु, प्लेबॉय इंटरव्ह्यू हे देखील या मॅगेझिनचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. जगातल्या प्रभावशाली व्यक्तिंपैकी माल्कम एक्स, फिडेल कॅस्ट्रोस मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर, हेन्री मिलर, कॅशियस क्ले असे अनेकजण या मॅगेझिनमध्ये झळकले. परंतु, तुम्हाला वाचून धक्का बसेल की प्लेबॉयच्या वादग्रस्त पानांमध्ये झळकण्याचा पहिला मान मिळवणाऱ्या देशाचे प्रमुखांमध्ये कॅस्ट्रोही नव्हते वा कार्टरही नव्हते, ते होते भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू.
फोर्ब्स या नियतकालिकाने हा विलक्षण प्रसंग ताज्या अंकामध्ये नमूद केला आहे. प्लेबॉयच्या 1963 सालातील ऑक्टोबरच्या अंकामध्ये नेहरूंची प्रदीर्घ मुलाखत छापण्यात आली. नेहरूंनीही अत्यंत विस्तृत आणि सर्वांगी चर्चा करत आपली मतं या अंकामध्ये मांडली होती. लोकशाहीची बलस्थानं, तिचे कच्चे दुवे, शीतयुद्ध, आंतरराष्ट्रीय संबंध, भारताची लोकसंख्यावाढ आणि भारताचं भविष्य अशा अनेक विषयांवर नेहरूंनी प्लेबॉयच्या माध्यमातून आपली मते जगातल्या वाचकांपर्यंत पोचवली होती हे वाचून आज धक्का बसेल.
प्लेबॉय हे मॅगेझिनचं वादग्रस्त होतं आणि हे नेहरू प्रकरणही वादापासून लांब राहिलं नाही. याच अंकामध्ये संपादकांची टिप्पणी छापून आली होती. त्यात म्हटलं होतं, की बहुतेक मासिक छपाईला गेलं असताना, भारताच्या दूतावासाकडून आम्हाला असं सांगण्यात आलंय की, नेहरूंची मुलाखत ही काही एक्सक्लुझिव्ह व वैयक्तिक चर्चा नव्हती तर, पंतप्रधानांनी अनेक वर्षांमध्ये वेगवेगळ्या केलेल्या भाषणांमधील मतांचं ते संकलन होतं. थोडक्यात म्हणजे प्लबॉयला नेहरूंनी मुलाखत वगैरे काही दिली नाही.
परंतु, संपादकांनी स्वताच नंतर हे खोडून काढत म्हटलं की, ही मुलाखत एका प्रतिष्ठित पत्रकारानं घेतली होती आणि त्यानं नेहरूंबरोबर स्वताचा काढलेला फोटोदेखील दाखवला होता. त्यामुळे या मुलाखतीबद्दल शंका घेण्याचं कारण नाही, असं नमूद करण्यात आलं होतं.
ते काही असलं तरी, प्लेबॉयची प्रतिमा लक्षात घेता अशा अॅडल्ट मॅगेझिनमध्ये प्रदीर्घ मुलाखत छापून येणारा पहिला राष्ट्रप्रमुख हे जवाहरलाल नेहरू असावेत ही बाब नक्कीच गमतीशीर ठरावी.