प्लुटोच्या पृष्ठभागावर 'दिल' कोणी काढले? नऊ वर्षांनंतर शास्त्रज्ञांना मिळाले उत्तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 03:11 PM2024-04-19T15:11:18+5:302024-04-19T15:11:34+5:30
Pluto Heart Shape Reason: आपल्या सूर्यमालेतील बटू ग्रह प्लुटोच्या पृष्ठभागावर 'हृदयाचा' आकार बनलेला दिसतो, याचे रहस्य उलगडले आहे.
Pluto Heart-Shaped Feature: पृथ्वीपासून खुप दूर असलेल्या 'प्लुटो' ग्रहाच्या पृष्ठभागावर दिसणाऱ्या 'हृदय'चे रहस्य उलगडले आहे. 2015 पासून शास्त्रज्ञ प्लुटोच्या या 'हृदयाचे' रहस्य सोडवण्यात गुंतले होते. नासाच्या अंतराळयानाने प्लुटोभोवती फिरताना काही फोटो घेतले होते, त्यात प्लुटोच्या पृष्ठभागावर हृदयाचा आकारा दिसला होता. शास्त्रज्ञांनी याला टॉम्बाग रेजिओ(Tombaugh Regio) असे नाव दिले होते. या हृदयाचा आकार, भूगर्भीय रचना आणि उंचीमुळे शास्त्रज्ञांचा रस वाढला.
आता शास्त्रज्ञांनी या हृदयाचे मूळ शोधून काढले आहे. त्यांच्या मते एका मोठ्या प्रलयकारी घटनेने हे 'हृदय' निर्माण केले आहे. शास्त्रज्ञांच्या मते, अंदाजे 435 मैल (700 किलोमीटर) व्यासाची उल्का या प्लूटोवर आदळली असावी, ज्यामुळे हा आकार तयार झाला. तसेच, टॉम्बाग रेजिओचा हलका रंग नायट्रोजनयुक्त बर्फाच्यामुळे आहे. हा हृदयाचा आकार प्लुटोच्या 1200x2000 किलोमीटर परिसरात पसरलेला आहे. शास्त्रज्ञांनी प्लुटोवर केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष नेचर ॲस्ट्रॉनॉमी जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत.
तिरक्या कोनात उल्का आदळली...
संशोधनानुसार, त्या मोठ्या उल्केची प्लुटोशी थेट टक्कर झालेली नाही, तर थोड्या तिरकस कोनात झाली. अभ्यासाचे प्रमुख-लेखक डॉ. हॅरी बॅलेंटाइन यांनी सांगितले की, 'प्लूटोचा गाभा इतका थंड आहे की, टक्कर होऊनदेखील तो खूप टणक राहिला आणि उष्णता असूनही तो वितळला नाही. जो खडक फ्लुटोवर आदळला, त्याचा गाभा अजूनही प्लुटोवर गाडला गेला आहे.
वैज्ञानिकांना प्लुटोच्या 'हृदयात' रस का आहे?
प्लूटोच्या 'हृदया'कडे फक्त त्याच्या आकारामुळेच शास्त्रज्ञांचे आकर्षण नाही, तर तो इतर पृष्ठभागापेक्षा खूपच उजळ आहे. या 'हृदयाचा' पश्चिमेकडील भाग उर्वरित प्लुटोपेक्षा सुमारे 4 किलोमीटर खोल आहे. डॉ. बॅलेंटाइन म्हणाले की, 'प्लूटोचा बहुतांश भाग मिथेन बर्फ आणि त्याच्या डेरिव्हेटिव्ह्जपासून बनलेला आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, 'हृदया'चा पूर्वेकडील भागही अशाच नायट्रोजन बर्फात बुडलेला आहे. शास्त्रज्ञांना अद्याप त्याच्या निर्मितीचे कारण माहित नाही.