या राजाची कबर उघडायला पुरातत्वशास्त्रज्ञ का घाबरतात? काय आहे रहस्य? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 09:52 PM2024-01-19T21:52:19+5:302024-01-19T21:54:07+5:30
काही वर्षांपूर्वी या राजाची कबर सापडली. या कबरीच्या रक्षणासाठी हजारो सैनिक तैनात आहेत.
जगभरात असे अनेक राजे होऊन गेले, ज्यांच्याबद्दल आजही फार कमी लोकांना माहिती नाही. अशा राजांचा इतिहास म्हणजे, आजच्या इतिहासकारां किंवा पुरातत्वशास्त्रज्ञांनासाठी मोठे रहस्य आहे. असाच एक राजा चीनमध्ये होऊन गेला. हा चीनचा पहिला राजा होता, ज्याची कबर आजच्या पुरातत्वशास्त्रज्ञांना चकीत करते.
काय आहे कबरीचे रहस्य
आपण ज्या राजाच्या कबरीबद्दल बोलत आहोत, किन शी हुआंगची प्राचीन कबर आहे. प्राचीन चिनी इतिहासकार सिमा कियान यांनी राजाच्या मृत्यूच्या जवळपास एक शतकानंतर हुआंगच्या कबरीबद्दल लिहिले होते आणि या कबरीशी संबंधित धोक्यांबद्दल सर्वांना इशारा दिला होता. तेव्हापासून ही कबर उघडण्यास कोणीही पुढे आले नाही.
2000 वर्षे जुनी कबर
1974 मध्ये चीनच्या शानक्सी प्रांतातील काही शेतकऱ्यांनी ही कबर पहिल्यांदा शोधली होती. पण जेव्हा पुरातत्वशास्त्रज्ञांनी यावर संशोधन केले, तेव्हा त्यांना कळले की ही कबर चीनच्या पहिल्या सम्राटाची आहे आणि ही सुमारे 2000 वर्षे जुनी आहे. उत्खननादरम्यान कबरीभोवती दगडी सैनिकांची एक फौज आढळून आली.
रक्षणासाठी सैनिकांची फौज
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका अहवालात दावा करण्यात आला आहे की, ही कबर बनवण्यासाठी कारागिरांनी एका खास तंत्राचा वापर केला आहे. या कबरीत तैनात असलेल्या सर्व दगडी सैनिकांच्या हातात तीन धनुष्य आहेत आणि ते आक्रमणाच्या मुद्रेत दिसतात. याशिवाय या कबरीत पाऱ्याची एक गुंतागुंतीची व्यवस्था करुन ठेवण्यात आली आहे.
या सैन्याला टेराकोटा आर्मी म्हणतात. या परिसरात उत्खनन केले असता, या कबरीच्या रक्षणासाठी 8000 सैनिक तैनात असल्याचे आढळून आले. चकीत करणारी बाब म्हणजे, या सैनिकांच्या चेहऱ्यावरील हावभाव अतिशय जीवंत व्यक्तीप्रमाणे दिसतात. यावर हॉलिवूडचा चित्रपटही तयार झाला आहे. द ममी चित्रपटामध्ये हे सैनिक जिवंत झाल्याचे दाखवण्यात आले आहे.