पुरुष हवेत कशाला?- मेरीचा ‘नाला क्लब’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2022 08:45 AM2022-12-12T08:45:38+5:302022-12-12T08:46:01+5:30

मेरी न्गुगी ही केनियाची स्टार ॲथलिट! मागच्या वर्षीच्या बोस्टन मॅरेथॉनची रजतपदक विजेती रनर. त्याशिवाय इतर काही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये बक्षिसं ...

Why are men have?- Mary's 'Nala Club'! | पुरुष हवेत कशाला?- मेरीचा ‘नाला क्लब’!

पुरुष हवेत कशाला?- मेरीचा ‘नाला क्लब’!

Next

मेरी न्गुगी ही केनियाची स्टार ॲथलिट! मागच्या वर्षीच्या बोस्टन मॅरेथॉनची रजतपदक विजेती रनर. त्याशिवाय इतर काही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये बक्षिसं तिच्या नावावर आहेत, पण सातत्याने जगातले सर्वोत्तम धावपटू देणाऱ्या केनियात ही काही तिची सगळ्यात महत्त्वाची ओळख नाही. आजघडीला तिची सगळ्यात महत्त्वाची ओळख आहे ती म्हणजे तिने केनियातील पहिलं ‘केवळ महिलांसाठी’ असलेलं प्रशिक्षण केंद्र सुरू केलं आहे.
तिने काही आठवड्यांपूर्वीच महिलांसाठी ‘नाला ट्रॅक क्लब’ सुरू केला आहे. खरं म्हणजे केनियामध्ये धावपटूंना प्रशिक्षण देणारे अनेक प्रशिक्षक आणि क्लब्ज आहेत. मग हा केवळ महिलांसाठी असलेला क्लब मेरीला का सुरू करावासा वाटला असेल? 

- त्यामागचं कारण फारच दुर्दैवी आहे. मागच्या वर्षी मेरीच्या बरोबरची २५ वर्षांची एक आंतरराष्ट्रीय धावपटू ऍग्नेस टायरप हिचा खून झाला. तीही केनियाची मोठी धावपटू होती. तिला विश्वविजेतेपद स्पर्धेत दोन वेळा पदक मिळालेलं होतं. ‘फक्त महिलांच्या’ १० किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेचा विश्वविक्रम तिच्या नावावर होता. त्यानंतर अनेक दिवसांनी इब्राहिम रॉटिक या तिच्या नवऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला. त्याने तो आरोप नाकारला आणि त्याबद्दलची केस कोर्टात सुरू आहे. मात्र, त्या निमित्ताने केनियामधील लिंगाधारित गुन्ह्यांचं प्रमाण हा विषय समाजासमोर आला. महिलांवर होणारा अन्याय आणि अत्याचार थांबवण्याची चळवळ केनियात उभी राहिली.
या चळवळीच्या निमित्ताने जी वैचारिक घुसळण झाली त्यात मेरी न्गुगीच्या लक्षात आलं की, तिने आजवर अनेक प्रशिक्षकांकडे प्रशिक्षण घेतलं होतं. मात्र, त्यात एकही महिला नव्हती. प्रशिक्षक या पदावरच्या व्यक्तीच्या हातात फार जास्त सत्ता असते. आपल्याकडे प्रशिक्षण घेणाऱ्या मुलांचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य घडवण्याची किंवा बिघडवण्याची पूर्ण क्षमता त्याच्याकडे असते. एखादा प्रशिक्षक जर त्याच्या महिला धावपटूंकडे  वाईट नजरेने बघत असेल तर त्याला तो गुन्हा करणं सहज शक्य होऊ शकतं.
टायरपच्या मृत्यूनंतर २०२२ सालच्या सुरुवातीला केनियाच्या क्रीडा मंत्रालयाने देशातील महिला खेळाडू आणि त्यांच्या बाबतीत होणारा भेदभाव याबद्दलचा एक अहवाल जाहीर केला. हा अहवाल माजी मॅरेथॉनपटू कॅथरीन एन्डेरेबा हिने संकलित केला होता. त्यात असं लिहिलं होतं, की महिला खेळाडूंच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात भेदभाव केला जातो. मात्र, तो कधीच जगजाहीर होत नाही. कोणी त्याविरुद्ध तक्रार करीत नाही, की कोणी त्याचा अहवाल वरिष्ठांकडे, माध्यमांपर्यंत पोहोचवत नाही. 
दुसऱ्या एका सर्वेक्षणात ४८६ महिला केनियन खेळाडूंची माहिती विचारण्यात आली. त्यापैकी ११ टक्के खेळाडूंनी सांगितलं की, त्यांनी आजवर अनेकदा लैंगिक, शारीरिक आणि मानसिक अत्याचाराला तोंड दिलं होतं. ५७% टक्के खेळाडूंनी सांगितलं, त्यांनी १० हून जास्त वेळा अशा प्रकारचा अनुभव घेतला होता.

मेरी म्हणते, “तुम्ही जेव्हा एखादी लहान किंवा तरुण मुलगी म्हणून एखाद्या क्रीडा शिबिराला जाता तेव्हा तुम्ही कधीही पूर्णपणे निश्चिंत राहू शकत नाही. तुमचा प्रशिक्षक किंवा बरोबरचे पुरुष खेळाडू तुमच्याशी कसे वागतील याची भीती आणि दडपण बहुतेक वेळा मनावर असतंच. तुम्हाला काहीही करून गावी परत जायचं नसतं. तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करायचं असतं, पण त्याची फार मोठी किंमत काही वेळा चुकवायला लागू शकते.”अर्थात ही फार टोकाची शक्यता झाली. एखाद्या खेळात जेव्हा सगळे प्रशिक्षक पुरुष असतात तेव्हा त्यातून एक व्यापक प्रकारची असमानता निर्माण होते. कुठल्याही प्रकारची असमानता ही पुढे होणाऱ्या अत्याचारांची पायाभरणी करत असते. म्हणूनच मेरी न्गुगीने महिला धावपटू आणि प्रशिक्षक तयार करणारा क्लब सुरू केला आहे.

मी योग्य ‘ट्रॅक’वर आहे..
मेरी म्हणते, “संख्याबळ ही फार मोठी गोष्ट असते. आम्ही जास्तीत जास्त महिला प्रशिक्षक तयार करण्याचा प्रयत्न करतो आहोत. कारण महिला प्रशिक्षकांची संख्या वाढेल तेव्हाच या क्षेत्रात स्त्री-पुरुष समानता येऊ शकेल!” आज मेरीच्या नाला ट्रॅक क्लबमध्ये अनेक लहान मुली प्रशिक्षण घेत आहेत. या मुलींकडे बघून मेरीचा हुरूप खूप वाढतो. तिच्या मनात कायम विचार येतो, मी त्यांच्या वयाची होते तेव्हा जर मला मदत मिळाली नसती तर मी आज जिथे आहे तिथे कधीच पोहोचू शकले नसते. आज मी तीच मदत या मुलींना करते आहे. त्या किती खूश आहेत हे बघून पावती मिळते की मी योग्य ‘ट्रॅक’वर आहे. महिला स्टार घडवण्यासाठी अक्षरश: वाट्टेल ते करण्याची तिची तयारी आहे.

Web Title: Why are men have?- Mary's 'Nala Club'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.