दिल्लीच्या कॅब ड्रायव्हर्सना गाडीत कंडोम का ठेवावा लागतोय? जाणून घ्या कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 11:57 AM2019-09-21T11:57:39+5:302019-09-21T12:04:39+5:30
देशभरात सध्या सुधारित मोटर वाहन कायदा लागू झाला आणि दररोज कित्येक दंडाच्या बातम्या येऊ लागल्या. दररोज एक नवी नियम ऐकायला मिळत आहे.
देशभरात सध्या सुधारित मोटर वाहन कायदा लागू झाला आणि दररोज कित्येक दंडाच्या बातम्या येऊ लागल्या. दररोज एक नवी नियम ऐकायला मिळत आहे. सोशल मीडियातून तर यावर टिकाही होत आहे तर काही लोक याचं कौतुकही करत आहेत. आता दिल्लीतील एक वेगळाच नियम सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. चार चाकी वाहनांमध्ये फर्स्ट एड बॉक्स असणं गरजेचं आहे, हे तुम्हाला माहीत आहेच.
या फर्स्ट एड बॉक्समध्ये डेटॉल, पॅरासिटामोल टॅबलेट्स, बॅंडेज आणि कंडोम ठेवणं गरजेचं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, फर्स्ट एड बॉक्समध्ये कंडोम ठेवणं गरजेचं का आहे? चला जाणून घेऊ यामागचं कारण...
दिल्लीतील जास्तीत जास्त कॅब ड्रायव्हर्सचं म्हणणं आहे की, फर्स्ट एड बॉक्समध्ये कंडोम न ठेवल्याने पोलीस त्यांना दंड ठोठावत आहेत. त्यामुळे प्रत्येक कॅब ड्रायव्हरला फर्स्ट एड बॉक्समध्ये कंडोम ठेवण्याची गरज पडत आहे.
(Image Credit : upto8000m.com)
दिल्लीच्या सर्वोदय ड्रायव्हर असोसिएशनचे अध्यक्ष कमलजीत गिल यांनी सांगितले की, 'सर्वच सार्वजनिक वाहनांच्या ड्रायव्हर्सना कमीत कमी तीन कंडोम फर्स्ट एड बॉक्समध्ये ठेवणं गरजेचं आहे. याचा वापर कुणाच्या हाडाला जखम झाली किंवा कुठे कापलं गेलं तर केला जाऊ शकतो. जर एखाद्या व्यक्तीला ब्लीडिंग होत असेल तर कंडोमच्या माध्यमातून रोखलं जाऊ शकतं. त्याचप्रमाणे फ्रॅक्चर झाल्यास त्या जागेवर कंडोम बांधला जाऊ शकतो'.
(Image Credit : scoopwhoop.com)
दरम्यान, ट्रॅफिकच्या नियमांनुसार, फर्स्ट एड बॉक्समध्ये कंडोम ठेवण्याची गरज नाही. फिटनेस टेस्ट दरम्यानही अशी काही तपासणी केली जात नाही.
यावर दिल्लीच्या पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, जर कंडोम नसल्याने दंड भरावा लागला असेल तर कॅब ड्रायव्हर्सनी अथॉरिटीजना संपर्क करावा. अनेकदा एनजीओ वर्कर ड्रायव्हर्सना सुरक्षित शारीरिक संबंधाबाबत सांगतात. कदाचित याच कारणाने ते कंडोम ठेवत असतील, पण दिल्ली मोटर व्हेइकल रूल्स १९९३ आणि सेंट्रल मोटर व्हेइकल्स रूल्स १९८९ यात कंडोम ठेवण्यासंबंधी काहीही उल्लेख आढळत नाही.