Shocking: चीनमध्ये का पिलं जातं झुरळांचं सूप आणि सरबत? कारण वाचून व्हाल हैराण...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 03:53 PM2021-06-10T15:53:40+5:302021-06-10T15:55:39+5:30
जगात असाही देश आहे जिथे झुरळ खूप पसंत केले जातात. इतकंच नाही तर इथे मोठ्या आवडीने झुरळ खातात आणि त्यांचं सरबत पितात.
झुरळ किंवा कॉकरोचच्या नावानेच काही लोक घाबरतात. इतकंच नाही तर झुरळाचं नाव काढलं तर काही लोकं कसंतरी तोंड करतात. तर काही लोक झुरळ दिसताच घाबरून उड्या मारू लागतात. पण जगात असाही देश आहे जिथे झुरळ खूप पसंत केले जातात. इतकंच नाही तर इथे मोठ्या आवडीने झुरळ खातात आणि त्यांचं सरबत पितात.
चीनसहीत आशियातील अनेक देशांमध्ये झुरळ तळून खाल्ले जातात. मात्र, आता यांचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जात आहे. ज्यामुळे झुरळ आता अनेक लोकांसाठी उत्पन्नाचं साधन ठरत आहेत. साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, चीनच्या शीचांग शहरातील एक औषध कंपनी दरवर्षी एका बिल्डींगमध्ये ६०० कोटी झुरळांचं पालन करते.
ज्या बिल्डींगमध्ये या झुरळांचं पालन केलं जातं त्याचं क्षेत्रफळ साधारण २ मैदानांइतकं आहे. इथे झुरळ पाळले जातात. या बिल्डींगमध्ये सतत अंधार असतो आणि तेथील वातावरणात उष्णता रहावी म्हणून बल्बचा वापर केला जातो. या फार्मच्या आता कीड्यांना फिरण्याचं आणि प्रजननाचं स्वातंत्र असतं. त्यांना सूर्यप्रकाशापासून दूर ठेवलं जातं आणि अशी व्यवस्था केलेली असते की, ते बिल्डींगच्या बाहेर जाऊ शकत नाहीत.
का पितात झुरळाचं सरबत?
आर्टिफिशिअल इंटॅलिजन्स सिस्टीमने झुरळांवर लक्ष ठेवलं जातं. त्याद्वारे बिल्डींगमधील तापमान, खाण्याची उपलब्धता आणि वातावरण यावर नियंत्रण ठेवलं जातं. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त झुरळांना जन्माला घालण्याचं लक्ष्य असतं. जेव्हा झुरळ वयस्क होता तेव्हा त्यांना चिरडण्यात येतं आणि त्यापासून तयार सरबत चीनमध्ये परंपरागत औषध म्हणून पिलं जातं. याचा वापर जुलाब, उलटी, पोटातील अल्सर आणि श्वासाची समस्या आणि इतरही काही आजारांच्या उपचारात केला जातो.
चीनच्या शानडोंग कृषि विश्वविद्यालयाचे प्राध्यापक लियु यूशेंग यांनी चीनी मीडियाला सांगितले की, झुरळ एका औषधासारखे असतात. त्यांच्यापासून अनेक आजार दूर होऊ शकतात. चीनमध्ये वयोवृद्ध लोकांची संख्या जास्त असणे एक समस्या आहे. त्यांच्या उपचारासाठी आम्ही सतत नवीन औषधांचा शोध घेत असतो. ही औषधे स्वस्त आणि सहज उपलब्ध होतात.