वाढदिवसाला ‘केक’का कापतात, कारण माहित्येय का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 05:14 AM2022-03-25T05:14:54+5:302022-03-25T05:16:28+5:30

वाढदिवसाला केक बेक करायचा, त्यावर मेणबत्त्या लावून विझवायच्या आणि मग तो कापायचा आणि सगळ्यांनी वाटून खायचा हे कुणी ठरवलं?

Why cut a cake on birthday know reason behind it | वाढदिवसाला ‘केक’का कापतात, कारण माहित्येय का?

वाढदिवसाला ‘केक’का कापतात, कारण माहित्येय का?

googlenewsNext

- भक्ती चपळगावकर, मुक्त पत्रकार, bhalwankarb@gmail.com

वाढदिवस साजरा करायचा म्हणजे केक हवाच हवा. जगातल्या बहुतेक सगळ्या देशांत वाढदिवसाला केक कापायची आणि खायची पद्धत आहे. वाढदिवसाला केक बेक करायचा, त्यावर मेणबत्त्या लावून विझवायच्या आणि मग तो कापायचा आणि सगळ्यांनी वाटून खायचा हे कुणी ठरवलं? ऐकून गंमत वाटेल की, या केक सोहळ्यात जगातल्या वेगवेगळ्या संस्कृतींनी आणि देशांनी भर घातली आहे. 

बेकिंग कसं करायचं, हे प्राचीन इजिप्शियन बल्लवाचार्यांना माहीत होतं, ते केकही बनवत. पण आजच्यासारखा लुसलुशीत नाही बरं. पुढे ग्रीसमध्ये केक बेक व्हायला सुरुवात झाली. आपल्या चंद्र देवतेच्या आराधनेसाठी ग्रीक लोक केक बनवू लागले. मंदिरात केकचा नैवेद्य दाखवताना त्यावर चंद्राच्या आकारात मेणबत्त्या लावायची पद्धतही या काळात होती. 

काळ पुढे गेला, पण केक या ना त्या स्वरूपात बनवण्याची पध्दत अनेक ठिकाणी होती. केक वाढदिवसाच्या दिवशी आणूयात ही कल्पना मात्र जर्मनांची. जर्मन आई-बाबा केक खायला द्यायच्या आधी बर्थडे बॉय किंवा बर्थडे गर्लला फार तंगवायचे. केकवर दिवसभर मेणबत्ती लावून ठेवायचे; पण ती विझवायचे नाहीत. उलट एक मेणबत्ती संपली की दुसरी लावायचे. मध्यरात्री केकवरची मेणबत्ती विझली की मग तो कापून खायचा, ही पद्धत होती. केकवर लावलेली मेणबत्ती आपल्या मुलाला एक वर्ष आयुष्य मिळालं, याचा आनंद व्यक्त करण्यासाठी होती. आधुनिक औषध-उपचार पध्दतीचा विकास होण्याआधी लहान मुलांचा मृत्यूदर जास्त होता, म्हणून कदाचित ही पद्धत असणार. या उत्सवाला जर्मनीत किंडरफेस्ट म्हणत. 

केक बनवताना लागणा-या वस्तू महाग आणि सहज न मिळणाऱ्या होत्या, त्यामुळे केक बनवणं हे श्रीमंती लक्षण होतं. औद्योगिक क्रांतिमुळे केकसाठी लागणाऱ्या वस्तूही स्वस्त झाल्या आणि घरोघरी केक बनू लागले. इंग्लंडसह युरोप आणि अमेरिकेत वाढदिवसाला केक बनू लागला. बेकिंग पावडरच्या शोधामुळे तो लुसलुशीत झाला. आज केकचे अक्षरशः शेकडो प्रकार आहेत. केकने सर्वांवर जादू केली आहे. आता केक कापताना ‘हॅपी बर्थडे टू यू’ असं का म्हणायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल, तर साहजिकच आहे, पण ती गोष्ट पुन्हा कधी तरी.

Web Title: Why cut a cake on birthday know reason behind it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.