वळू लाल रंगाचा कपडा पाहून इतका का चिडतो? आज जाणून घ्या याबाबतचं सत्य....
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 04:26 PM2021-12-03T16:26:48+5:302021-12-03T16:32:35+5:30
लाल रंग पाहिल्यावर वळू इतका चिडतो का? लाल रंगावर वळूचा राग आहे की त्याला आवडत नाही? की यामागे काही दुसरं कारण आहे?
तुम्ही अनेकदा व्हिडीओत, सिनेमात पाहिलं असेल की, 'लाल रंग' पाहिल्यावर वळू चिडतो. यादरम्यान तो इतका संतापतो की, कुणालाही मारण्यासाठी उतावळा असतो. स्पेनसहीत जगातल्या काही देशांमध्ये असे खेळले जातात, ज्यात 'लाल रंगाचा' कपडा दाखवून वळूला भडकवलं जातं. यानंतर वळू असा काही धिंगाणा घालतो, जो बघून थरकार उडतो.
लाल रंग पाहिल्यावर वळू इतका चिडतो का? लाल रंगावर वळूचा राग आहे की त्याला आवडत नाही? की यामागे काही दुसरं कारण आहे? जर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल पण कधी याचं उत्तर मिळालं नसेल तर आज त्याचं उत्तर जाणून घ्या.
वळूला लाल रंग पाहिल्यावर राग येतो, असं त्या खेळांच्या आधारावर म्हटलं जातं, ज्यात वळूला लाल रंगाचा कपडा दाखवला जातो. लाल रंग पाहून वळू भडकतो, हे मुळात एक फार मोठं मिथक आहे. खरंतर इतर चार पायांच्या प्राण्यांप्रमाणे वळूही कलर ब्लाइंड असतात. म्हणजे त्यांना लाल आणि हिरवा रंग दिसत नाही. जर वळू लाल रंग बघूच शकत नाही तर तो भडकण्याचा दावा केवळ एक मिथक बनून राहतो.
अशात वळूला लाल रंगाचा कपडा बघून नाही तर तो कपडा हलवण्याच्या पद्धतीवरून राग येतो. कपडा कोणताही असू द्या वळूला त्याने काही फरक पडत नाही. खेळादरम्यान वळूसमोर कपडा सतत हलवला जातो. हे बघून वळू संतापतो आणि मग कुणावरही हल्ला करतो.
खरंतर लाल रंगाला वळूच्या चिडण्यासोबत जोडण्याची प्रथा सुरू झाली कारण एकदा स्पेनमध्ये एक वळू लाल रंगाचे कपडे घातलेल्या व्यक्तीच्या मागे लागला होता. तेव्हापासून येथील पारंपारिक खेळांमध्ये वळूला भडकावण्यासाठी लाल रंगाच्या कपड्याचा वापर केला जातो. पण हा केवळ एक गैरसमज आहे.
जर वळूसमोर लाल रंगाच्या कपड्याऐवजी दुसऱ्या कोणत्याही रंगाचा कपडा हलवला तरी तो संतापतो. जर तुम्हाला या गोष्टीवर विश्वास नसेल तर एकदा लाल रंगाच्या कपड्याऐवजी वळूसमोर दुसऱ्या रंगाचा कपडा वापरून बघा.