रेल्वे स्थानकांच्या नावापुढे का लावलं जातं जंक्शन, सेंट्रल, टर्मिनस? काय आहे याचा अर्थ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 10:48 PM2023-05-01T22:48:35+5:302023-05-01T22:50:25+5:30
जगातील चौथ्या क्रमांकाचं रेल्वे नेटवर्क भारतात आहे. भारतीय रेल्वेनं दररोज लाखो लोक प्रवास करतात.
What is Junction Central Terminus : जगातील चौथ्या क्रमांकाचं रेल्वे नेटवर्क भारतात आहे. भारतीय रेल्वेनं दररोज लाखो लोक प्रवास करतात. ती देशाची जीवनवाहिनी म्हणून काम करते. रेल्वे हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. रेल्वे प्रवासाच्या वेळी असे अनेक प्रश्न तुमच्या मनात आले असतील, ज्यांची उत्तरे तुम्हाला जाणून घेण्याची इच्छाही झाली असेल. ट्रेनच्या शेवटच्या डब्याच्या मागील बाजूस X का लिहिलेले असते? रेल्वे स्थानकाच्या मागे जंक्शन, सेंट्रल आणि टर्मिनस असं का लिहिलेलं असतं. याचा अर्थ काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जाणून घेऊया नक्की याचा अर्थ काय?
जंक्शनचा अर्थ काय?
अनेक स्थानकांच्या नावामागे जंक्शन लिहिलेलं असतं. सहसा ते प्रमुख स्थानकाच्या नावाच्या मागे असतं. जर एखाद्या स्टेशनच्या नावापुढे जंक्शन लिहिलेलं असेल तर याचा अर्थ असा होतो की या स्थानकावर ट्रेनला जाण्यायेण्यासाठी एकापेक्षा अधिक रुट आहेत. अशा स्थानकांच्या मागे जंक्शन लिहिलेले असते.
सेंट्रलचा अर्थ काय?
काही रेल्वे स्थानकांच्या नावांसोबत सेंट्रल लिहिलेलं असतं. स्टेशनच्या शेवटी सेंट्रल लिहिलं असेल तर याचा अर्थ त्या शहरात एकापेक्षा अधिक रेल्वे स्टेशन आहेत. ज्या स्टेशनच्या नावासमोर सेंट्रल लिहिलेलं असते ते त्या शहरातील सर्वात जुनं रेल्वे स्थानक आहे. तसंच सेंट्रलवरून हे देखील कळतं की ते स्थानक शहरातील सर्वात वर्दळीचं रेल्वे स्थानक आहे.
टर्मिनस/टर्मिनलचा अर्थ
काही स्थानकांवर त्यांच्या नावांपुढे टर्मिनस किंवा टर्मिनल लिहिलेलं असतं. जर एखाद्या रेल्वे स्थानकाच्या नावासोबत टर्मिनस किंवा टर्मिनल लिहिले असेल तर त्याचा अर्थ त्या स्थानकाच्या पलीकडे रेल्वे ट्रॅक नाही. म्हणजे ट्रेन ज्या दिशेहून आली आहे, त्याच दिशेनं परत जाते.