पत्त्यामधील सर्वच राजांना आहेत मिशा पण बदामच्या राजालाच का नाहीत? जाणून घ्या रहस्य....
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 12:28 PM2019-12-13T12:28:51+5:302019-12-13T12:44:32+5:30
पत्त्यांमधील एका राजा इतरांपेक्षा वेगळा दिसतो यावर कधी तुमचं लक्ष गेलंय का?
पूर्वी सुट्ट्यांमध्ये, प्रवासात पत्ते खेळणे हा सर्वांचाच आवडता टाइमपास होता. कितीतरी लोकांच्या कितीतरी आठवणी या पत्त्यांसोबतच्या असतील. पण आता पत्ते खेळणं फारच कमी झालंय. याला कारण मोबाइल म्हणता येईल. पण जे जे लोक पत्ते खेळले असतील त्यांना पत्त्यांबाबत बरीच माहिती असेल.
पत्ता हा पुठ्ठ्यापासून किंवा प्लास्टिकपासून बनविण्यात येणारा एक हाताच्या पंजाएवढा पातळ चौकोनी कागद आहे. अनेक पत्त्यांच्या संचाला कॅट म्हणतात. परंतु एका कॅटमध्ये काही विशिष्ट पत्तेच असावे लागतात. पत्ते हे विविध बैठे खेळ खेळण्यासाठी वापरण्यात येतात.
सर्व पत्त्याची एक बाजू समान असते. मात्र प्रत्येक पत्त्याची दुसरी बाजू दुसऱ्या पत्त्यापासून वेगळी असते. खेळाव्यतिरीक्त पत्त्यांचा वापर जादूमध्ये, भविष्यकथनात व पत्त्यांचे बंगले बनविण्यातही होतो. जुगारामध्येही त्यांचा वापर विशेषकरुन होतो.
पण तुम्ही कधी लक्ष दिलं असेल तर लक्षात येईल की, यातील तीन राजांना मिशा आहेत. पण बदामच्या राजाला मिशा नाहीत. तसेच तो त्याची तलवार स्वत:च्याच डोक्यात घुसडण्याचा प्रयत्न करताना दिसतो. आता हा एकटाच बदामचा राजा वेगळा का दाखवला, याबाबत वेगवेगळ्या आख्यायिक वाचायला मिळतात.
(Image Credit : Social Media)
technology.org या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, एक आख्यायिका म्हणजे पत्ते हे ब्रिटनमध्ये फ्रान्समधून आले. मुळात पत्त्यांचा आविष्कार चीनमध्ये झाला होता. तिथून वेगवेगळ्या देशांमध्ये यांचा प्रसार झाला. असे म्हणतात की, सुरूवातीला बदामच्या राजाला मिशा होत्या. कारण फ्रान्समध्ये वास्तविक राजांवरूनच यांचं चित्रण केलं गेलं होतं. आणि १५ व्या शतकात चार्ल्स राजाचा फोटो बदामच्या राजासाठी देण्यात आला होता. नंतर पुढे लाकडाच्या ब्लॉकने प्रिंटींग करताना आणि इतरही काही कारणांनी या राजाची मिशी गायब झाली आणि कुऱ्हाडही गायब झाली.