एक असा समाज ज्यात महिलांच्या गळ्यात रिंग घालून लांब केली जाते मान, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 01:18 PM2024-08-07T13:18:34+5:302024-08-07T13:36:09+5:30
या महिला अशा रिंग गळ्यात का घालतात? असाही प्रश्न अनेकांना पडतो. याचंच उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.
जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे रितीरिवाज आहेत. वेगवेगळ्या समाजाच्या लोकांमध्ये वेगवेगळ्या मान्यता असतात. काही देशांमध्ये आजही काही समाज प्राचीन मान्यतांचं पालन करतात. असाच एक समाज म्यानमारमध्ये आहे. या समाजातील महिलांची मान सामान्यापेक्षा लांब असते. येथील महिला आपल्या गळ्यात धातुच्या रिंग घालतात. त्यांच्या या वेगळेपणामुळे शेकडो पर्यटक इथे येतात आणि त्यांच्यासोबत फोटो काढतात. या महिलांना बघून लोक थक्कही होतात. पण या महिला अशा रिंग गळ्यात का घालतात? असाही प्रश्न अनेकांना पडतो. याचंच उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.
अल जजीरा न्यूज वेबसाईटनुसार, म्यानमारच्या कायन जमातीमधील महिला गळ्यात पितळेच्या रिंग घालतात. एका रिंग एकावर एक घातल्या जातात. लहानपणापासून या रिंग घातल्यामुळे त्यांच्या मानेचा आकार बारीक आणि लांब होतो.
काय आहे यामागचं कारण?
या समाजातील लोकांमध्ये अशी मान्यता आहे की, महिलांची मान जेवढी बारीक आणि लांब असेल त्या तेवढ्या जास्त सुंदर दिसतात. या रिंग वजनी असतात. मात्र, तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, जेव्हा ही प्रथा सुरू झाली होती तेव्हा असं मानलं जात होतं की, महिलांची मान लांब असेल तर त्या बेढब दिसतील आणि दुसऱ्या समाजातील लोक त्यांचं अपहरण करणार नाही. अशाप्रकारे त्या स्वत:ला सुरक्षित ठेवू शकतात.
एक मान्यता अशीही आहे की, ज्या गावांमध्ये हे लोक राहतात, तिथे वाघांची संख्या जास्त आहे. वाघ नेहमीच लोकांवर हल्ला करतात. हल्ला करत असताना वाघ सगळ्यात आधी मनुष्याच्या मानेवर हल्ला करतात. त्यामुळे येथील महिला वर्षानुवर्षे धातुच्या रिंग आपल्या गळ्यात घालतात.
मुली ५ ते ६ वयाच्या झाल्या की, त्यांना रिंग घालण्यास सांगितलं जातं. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे या रिंग खूप महागही असतात. यांची किंमत २० हजार रूपयांपर्यंत असते. आजकाल बऱ्याच मुली रिंग घालत नाहीत. पण परंपरा टिकवून ठेवण्यासाठी महिला या रिंग घालतात.