पहिल्या महायुद्धातील सैनिकाच्या नावाची नोट का व्हायरल होतेय?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2017 07:32 PM2017-10-09T19:32:18+5:302017-10-10T14:41:48+5:30
या नोटेवर लिहिलेल्या नावाचा शोध घेतल्यावर तो पहिल्या महायुद्धात सामिल झालेला एक तरुण होता असे स्पष्ट झाले आहे.
इंग्लडच्या एका नव्या चलनी नोटेवर पहिल्या महायुद्धात सामिल झालेल्या एका तरुणाचे नाव लिहिल्याचं दिसून आलंय. ही नोट इंटरनेटवर बरीच व्हायरल झाली. जॉन हॉड्सगन असे या नोटेवर लिहिले असून त्यावर त्यांचे वयही नमुद करण्यात आले आहे. खरेतर या तरुणाची महायुद्धाच्या इतिहासात काहीच नोंद नाही. मात्र या नोटेवर लिहिलेल्या नावाचा शोध घेतल्यावर तो पहिल्या महायुद्धात सामिल झालेला एक तरुण होता असे स्पष्ट झाले आहे.
क्लॅरी कॅरनी या महिलेला एटीएम मशीनमधून काढलेल्या पैश्यात ही १० पौंडाची नोट सापडली. त्यावर जॉन हॉड्सगन आणि त्यांचं वय लिहिल्याचं पाहून तिला आश्चर्य वाटलं. तिने इंटरनेटवर ही नोट टाकताच नेटिझन्सकडून ती बरीच व्हायरल झाली. याविषयी अनेकांनी वेगवेगळे तर्कवितर्क लावले आहेत. एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत क्लॅरी म्हणाली की, ‘ नोटांवर असं योद्ध्याचं नाव लिहिण्याची संकल्पना मला आवडली. जॉन यांचा इतिहास आणि त्यांनी युद्धात दिलेलं योगदान सर्वांच्या लक्षात राहावा, यासाठी त्यांचं नाव कोणीतरी नोटेवर लिहिलं असेल.’
इंग्लडमध्ये २००० सालापासून १० पौंडाच्या नोटा चलनात आल्या आहेत. एका संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार जॉन हॉड्सगन यांचा जन्म १९ डिसेंबर १८९४ साली इंग्लडमध्ये झाला. त्यांचे वडील एक कारागीर होते. शिवाय त्यांना ७ भांवंडेही होती. कालांतराने जॉनसुद्धा कोरीव काम करू लागले. हे काम करत असतानाच १९०९ मध्ये त्यांनी मॅकफिल्ड टेक्निकल स्कूलमध्ये प्रवेश केला. शिक्षण झाल्यानंतर ते संडरलँड स्लिपर वर्क्समध्ये मेकॅनिक म्हणून काम करू लागले.
त्यानंतर ते रेजिमेंटच्या ७ व्या बटालियनमध्ये सामील झाले आणि 159व्या ब्रिगेड आणि 53व्या वेल्श विभागाच्या प्रशिक्षणानंतर काही काळ मध्यवर्ती भागात एका अज्ञात ठिकाणी सेवा देत होते. त्यानंतर ते जुलै १९१५ मध्ये डेवनपोर्टवरून इजिप्तमध्ये अलेग्जँड्रियाला गेले, मग ४ ऑगस्ट रोजी लिमनोस बेटावर पोहोचले.
त्यावेळी पहिले महायुद्ध सुरू होते. ८ ऑगस्टच्या संध्याकाळी बटालियन गालिओपोलीच्या किनाऱ्यावर पोहचले आणि उतरल्यावर ते अंदाजे साडेआठ वाजण्याच्या सुमारास अनफ्राता सघीरच्या मागे हल्ला सुरू झाला. या हल्ल्यात जॉन शरण झाल्याचे म्हटले जाते. ते बराचवेळ अज्ञातवासात होते. कोणालाच त्यांचा पत्ता लागला नाही. दरम्यान, ९ ऑगस्ट १९१५ रोजी ते मृत पावले असावेत असं म्हटलं जातं. ते मरण पावले तेव्हा त्यांचं वय अवघे २१ वर्षांचे होते. इतिहासात यांचं नाव फार कमी वेळा आलं आहे. मात्र त्यांचा विसर पडू नये यासाठी कोणीतरी नोटेवर त्यांचं नाव लिहिलं असावं असा अंदाज व्यक्त केला जातोय.