१०० रूपयांच्या नव्या नोटेवरील चित्र कशाचं? का या चित्राची केली निवड?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 11:05 AM2018-07-23T11:05:47+5:302018-07-23T11:25:07+5:30
रिझर्व बॅंक ऑफ इंडियाकडून लवकरच बाजारात नवीन १०० रूपयांची नोट जारी केली जाणार आहे. या नव्या नोटेचं डिझाइन काही दिवसांपूर्वीच जारी करण्यात आलं.
नवी दिल्ली : रिझर्व बॅंक ऑफ इंडियाकडून लवकरच बाजारात नवीन १०० रूपयांची नोट जारी केली जाणार आहे. या नव्या नोटेचं डिझाइन काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आलं. या नोटेच्या मागच्या बाजूला यूनेस्कोच्या यादीतील गुजरातच्या पाटन येथील राणीच्या विहिरीचा फोटो देण्यात आला आहे. हा फोटो पाहून अनेकांच्या मनात या जागेबाबत उत्सुकता निर्माण झाली. कारण अनेकांना या जागेबाबत काहीच माहीत नाही. देशाची संस्कृती दर्शवण्यासाठी याचा वापर नोटेवर करण्यात आला आहे.
राणीची विहीर
या ऐतिहासिक विहिरीचं निर्माण ११व्या शतकात सोलंकी साम्राज्यावेळी करण्यात आलं. यूनेस्कोने या राणीच्या विहिरीला वर्ल्ड हेरिटेज साइटमध्ये स्थान दिलंय. सरस्वती नदीच्या तटावर असलेल्या या विहिरीच्या खाली एक छोटा दरवाजा आहे. इतकेच नाही तर या विहिरीच्या आत ३० किमी अंतराचा एक बोगदाही आहे. पण सध्या हा बोगदा माती आणि दगडांच्या मदतीने बंद करण्यात आला आहे. राणीची विहीर ही ६४ मीटर लांब, २० मीटर रूंद आणि २७ मीटर खोल आहे. अशाप्रकरची देशातील ही एकच विहीर असल्याचे बोलले जाते.
राणीच्या विहीरीतील कलाकृती
राणीच्या विहिरीमध्ये अनेक कलाकृती आणि मूर्तीं तयार करण्यात आल्या आहेत. या सर्व कलाकृती भगवान विष्णु यांच्याशी संबंधीत आहेत. इथे भगवान विष्णुंच्या दशावतार रूपाची मूर्ती तयार करण्यात आली आहे. राणीची ही विहीर मारू-गुर्जरा आर्किटेक्चर स्टाइलमध्ये एका कॉम्प्लेक्समध्ये तयार करण्यात आली होती. आतल्या बाजूस एक मंदिरही आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, नवीन नोट पुढील महिन्यात बाजारात दाखल होणार आहे. नव्या नोटेचं प्रिंटींग सुरू झालं आहे. या नोटेंच गुजरात कनेक्शनही चांगलंच चर्चेत आहे.
१०० रूपयांची मेड इन इंडिया नोट
१०० रूपयांची ही नवीन नोट पूर्णपणे भारतीय असेल. या नोटचा केवळ कागद आणि केवळ शाईच नाही तर टेक्निकही भारतीय असेल. मध्य प्रदेशच्या देवास स्थित रिझर्व बॅंकेच्या प्रेसमध्ये या नोटांची छपाई केली जात आहे.