स्कूल बसेस पिवळ्या रंगाच्याच का असतात? जाणून घ्या नेमकं कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 01:22 PM2022-10-26T13:22:24+5:302022-10-26T13:23:17+5:30
या बसेसना वेगळा रंग का नसतो? जर तुम्हाला यामागचं कारण माहीत नसेल तर आज या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊ. पण त्याआधी जाणून घेऊ स्कूल बसेसची पार्श्वभूमी.
स्कूल बस तर तुम्ही पाहिली असेलच. तेव्हा तुमच्या असेही लक्षात आले असेल की, स्कूल बसेस या पिवळ्या रंगाच्या असतात. पण स्कूल बसेसना पिवळा रंग का दिला जातो? असा प्रश्न तुम्हाला पडलाय का? या बसेसना वेगळा रंग का नसतो? जर तुम्हाला यामागचं कारण माहीत नसेल तर आज या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊ. पण त्याआधी जाणून घेऊ स्कूल बसेसची पार्श्वभूमी.
स्कूल बसच्या वापराची सुरूवात सर्वातआधी उत्तर अमेरिकेत १९व्या शतकात केली गेली. मात्र, त्यावेळी मोटार गाडी नसल्याने शाळेपासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी आणि घरी सोडण्यासाठी घोडा गाडीचा वापर केला जात होता.
पुढे २०व्या शतकाच्या सुरूवातीला शाळेत गाडी म्हणून घोडा गाडीऐवजी मोटार गाड्यांचा वापर सुरू झाला होता. ही गाडी लाकूड आणि धातूपासून तयार केलेली असायची. तर या गाड्यांना केशरी किंवा पिवळा रंग दिलेला असायचा. जेणेकरून या गाड्यांमध्ये वेगळ्या दिसून याव्यात.
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, स्कूल बसेसना अधिकृतपणे पिवळा रंग देण्याची सुरूवात १९३९ पासून उत्तर अमेरिकेत झाली होती. भारत, अमेरिका आणि कॅनडासहीत जगातल्या अनेक देशातील स्कूल बसेस या पिवळ्या रंगाच्याच असतात. आता हा रंग या गाड्यांची ओळख बनला आहे.
सुप्रीम कोर्टाने देखील स्कूल बसेसबाबत अनेक दिशा-निर्देश जारी केले आहे. ज्यानुसार, खाजगी स्कूल बसेसचा रंग पिवळाच असावा. त्यासोबतच स्कूल बसच्या पुढे आणि मागे 'School Bus' लिहिलेलं असावं. आणि जर स्कूल बस रेंटने घेतली असेल तर त्यावर 'स्कूल बस ड्यूटी' लिहिणं गरजेचं आहे.
आता आपण जाणून घेऊ की, स्कूल बसेस या पिवळ्या रंगाच्याच का असतात? खरंतर यामागे एक वैज्ञानिक आणि सुरक्षेचं कारण आहे. १९३० मध्ये अमेरिकेत झालेल्या एका रिसर्चमध्ये हे स्पष्ट झालं होतं की, पिवळा रंग हा इतर रंगांच्या तुलनेत लवकर दृष्टीस पडतो. तसेच इतर रंगांमध्येही व्यक्तीचं लक्ष पिवळ्या रंगावर आधी जातं. वैज्ञानिकांनुसार, इतर रंगाच्या तुलनेत पिवळ्या रंगात १.२४ पटीने अधिक आकर्षण असतं.
स्कूल बसला पिवळा रंग हा सुरक्षेच्या दृष्टीने दिला जातो. कारण असंही मानलं जातं की, पिवळा रंग असल्याने बस दूरूनही स्पष्ट दिसू शकते. सोबतच पिवळ्या रंगाची बस पावसात, रात्रीही स्पष्ट दिसते. त्यामुळे दुर्घटना होण्याचा धोकाही कमी असतो.