भारतीयांसोबतच दक्षिण कोरियातील लोकांसाठीही अयोध्या पवित्र ठिकाण, पण कसे?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 04:53 PM2019-03-19T16:53:38+5:302019-03-19T16:55:17+5:30
अयोध्या शहर भारतातील लोकांसाठी फार पूर्वीपासून पवित्र शहर मानले जाते. पुराणकाळापासून ह्या शहराला एक वेगळं महत्व आहे.
अयोध्या शहर भारतातील लोकांसाठी फार पूर्वीपासून पवित्र शहर मानले जाते. पुराणकाळापासून ह्या शहराला एक वेगळं महत्व आहे. कारण शरयू नदीच्या तीरावर असलेल्या या अयोध्या नगरीत प्रभू श्रीराम ह्यांचा जन्म झाला होता, असे सांगितले जाते. मात्र तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, ज्याप्रमाणे भारतीयांसाठी हे ठिकाण पवित्र आहे. तसंच ते दक्षिण कोरियातील लोकांसाठीही आहे. म्हणून दर वर्षी शेकडो कोरियन लोक अयोध्येत एका स्मारकाला भेट देण्यासाठी येतात. तुम्ही म्हणाल कसं? तर चला याचं उत्तर मिळवूया...
दक्षिण कोरियाचं अयोध्येसोबत अनेक वर्षांपासूनचं भावनात्मक नातं आहे. इतिहासात याचे अनेक पुरावे मिळतात की, येथील एक राजकन्या दक्षिण कोरियाची राणी झाली आणि जवळपास २ हजार वर्षांपूर्वी तिने तिथे राज्य केले. या राणीचं नावं होतं सुरीरत्ना. तिला कोरियामध्ये Hur Hwang-ok असं नाव देण्यात आलं.
कोरियन इतिहासात सांगितले आहे की, अयोध्येच्या राजाने राजकन्या सुरीरत्नाला कोरियाला पाठवले. याचं कारण त्यांना पडलेलं एक स्वप्न आहे. सुरीरत्नासोबत तिचे भाऊ आणि तत्कालीन अयोध्याचे राजकुमारही गेले होते.
असेही सांगितले जाते की, ही राजकन्या बोटीने प्रवास करून दक्षिण कोरियाला गेली. त्यानंतर Geumgwan Gaya चा राजा सुरो याच्याशी लग्न करून त्याची राणी झाली. गया राज्याची ती पहिली राणी होती आणि जेव्हा तिने राजाशी विवाह केला तेव्हा ती फक्त १६ वर्षांची होती. कारक वंशाचा राजा किम सुरो याच्यासोबत तिने इसवी सन ४८ साली विवाह केला.
ह्या ऐतिहासिक संबंधांचे पुराने इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये आढळतात. कोरियाचे प्राचीन ऐतिहासिक कागदपत्रे Sam Kuk Yusa, मध्ये असे लिहिलेले आहे की, म्हणूनच तिचे स्मारक अयोध्येत आहे आणि ह्याच कारणाने Karak वंशाचे तब्बल ६० लाख लोक अयोध्येला त्यांचे आजोळ मानतात. ह्या स्मारकाचे उद्घाटन २००१ साली झाले.
अयोध्येमध्ये Hur Hwang-ok राणीच्या स्मरणार्थ कोरियन स्टाईलने स्मारक बांधलेले आहे. ह्यात एक तीन मीटर लांब इतका मोठा दगड वापरण्यात आला आहे. त्या दगडाचे वजन जवळजवळ ७५०० किलो आहे. आणि तो दगड खास दक्षिण कोरियातून मागवला आहे. हे स्मारक Kim-Hae-Kim वंशाच्या लोकांसाठी एक तीर्थक्षेत्र आहे.
दक्षिण कोरिया मध्ये राणीची समाधी Kimhae ह्या ठिकाणी बांधण्यात आली आहे. ह्या ठिकाणी त्या समाधीसमोर एक भव्य दगडी मंदिर सुद्धा बांधले आहे. असेही सांगितले जाते की, या मंदिराचं बांधकाम करण्यासाठी दगड अयोध्येतून आणले आहेत.