पती, पत्नी और वो! बायकोनेच नवऱ्याचं लग्न प्रेयसीसोबत लावलं; तिघे सुखाने नांदतात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 08:14 PM2023-04-25T20:14:17+5:302023-04-25T20:15:24+5:30
तपासात पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये लागलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्याचसोबत कॉल डिटेल्स पडताळणी केली
गुना - मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात असं प्रकरण समोर आलंय जे ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. याठिकाणी एका विवाहित पुरुषाचं १८ वर्षीय युवतीवर प्रेम जडलं. दोघेही लपून लपून एकमेकांना भेटत होते. पहिली पत्नी असूनही युवकाने प्रेयसीसोबत लग्न करण्याचं ठरवले. मात्र कहाणीत ट्विस्ट की पत्नीनेच प्रेयसी आणि पतीचे लग्न लावून दिले. प्रेयसी उपचाराच्या नावाखाली रुग्णालयात दाखल झाली तिथूनच दोघांनी पळून जाऊन लग्न केले.
गुना जिल्ह्यातील बजरंगगड येथे राहणारी युवती उपचारासाठी हॉस्पिटलला दाखल झाली होती. हॉस्पिटलमध्ये तिचे नातेवाईकही होते. युवती १८ वर्षाची होती. ६ एप्रिलला युवती अचानक हॉस्पिटलमधून गायब झाली. त्यानंतर नातेवाईकांनी तिचा शोध घेतला. युवतीच्या घरच्यांना तिचा थांगपत्ता लागला नाही. त्यानंतर तिच्या घरच्यांनी ७ एप्रिलला पोलीस स्टेशनला जात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला.
तपासात पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये लागलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्याचसोबत कॉल डिटेल्स पडताळणी केली. चौकशीत पोलिसांना युवतीबाबत माहिती सापडली. युवती अशोकनगर जिल्ह्यातील शाढोरा परिसरात राहत होती. त्यानंतर पोलिसांची टीम त्याठिकाणी पोहचली आणि युवतीला कोतवाली पोलीस स्टेशनला आणले. युवतीच्या कुटुंबाला याची माहिती दिली. पोलिसांसमोर युवतीने पळून गेल्याचे सांगितले. युवतीने प्रियकरासोबत लग्न केल्याचंही कुटुंबासमोर उघड केले.
पोलिसांसमोर युवतीने तिच्या घरच्यांसोबत जाण्यास नकार दिला. ती प्रियकरासोबतच राहील असं तिने म्हटलं. माझे खूप प्रेम आहे आणि मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही असं प्रेयसीने म्हटलं. विशेष म्हणजे प्रियकराचे याआधीच लग्न झाले होते. मुलगी अल्पवयीन नसल्याने पोलिसांनीही तिच्यावर दबाव टाकला नाही. ती सज्ञान असल्याने तिचा निर्णय घेऊ शकते असं पोलीस म्हणाले.
आता 'तिघे' एकत्र संसार करतात
युवतीच्या प्रियकराचे आधीच लग्न झाले होते. त्याच्या पत्नीनेही पतीच्या प्रेमाचा स्वीकार केला. लग्नावेळी स्वत: पत्नीही तिथे हजर होती. रिपोर्टनुसार, युवकाला पहिल्या पत्नीपासून कोणतेही मूल नाही. आता प्रेयसीसोबत लग्न केल्याने पती, पत्नी आणि प्रेयसी असे तिघेजण एकत्रित आनंदाने संसार करत आहेत. गुना जिल्ह्यात या अनोख्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे.