पती घरातील धुणी-भांडी करतो म्हणून पत्नीने मागितला घटस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2017 02:47 PM2017-11-09T14:47:15+5:302017-11-09T14:54:37+5:30
नवरा घरातील कामांमध्ये मदत करत नाही म्हणून वैतागलेल्या अनेक बायका तुम्ही पाहिल्या असतील. पण या जगात अशीही एक पत्नी आहे जी पतीच्या घरातील सगळी कामे आवरण्याच्या सवयीमुळे वैतागलेली आहे.
कैरो - नवऱ्याने घतकामात मदत करावी. ऑफीसमधून येताना बाजारातून भाजीपाला, किराणासामान घेऊन यावे, अशी प्रत्येक पत्नीची अपेक्षा असते. नवरा घरातील कामांमध्ये मदत करत नाही म्हणून वैतागलेल्या अनेक बायका तुम्ही पाहिल्या असतील. पण या जगात अशीही एक पत्नी आहे जी पतीच्या घरातील सगळी कामे आवरण्याच्या सवयीमुळे वैतागलेली आहे. तिचा नवरा तिला घरातील एकही काम करू देत नाही. नवऱ्याच्या या सवयीमुळे वैतागलेल्या महिलेले चक्क घटस्फोट मागितला आहे.
हे प्रकरण इजिप्तमधील आहे. येथील समर एम. नावाच्या 28 वर्षीय महिलेला तिचा पती घरातील एकही काम करू देत नाही. तो घरातील धुणी-भांडी करण्यापासून साफसफाई करण्यापर्यंत सगळी कामे करतो. एवढंच नाहीतर जेवणही बनवतो. त्यामुळे ही महिला वैतागली आहे. त्यामुळे विवाहाला दोन आठवडे होण्याच्या आतच तिने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
समर हिच्या पतीचे स्वत:चे कपड्यांचे दुकान आहे. मात्र स्वत:चा व्यवसाय सांभाळून तो घरकाम आवरतो. अल अरेबिया या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार समर सांगते की तिचा पती तिला घरातील कोणतेही काम करू देत नाही. त्यामुळे ती घरात कंटाळते. ती सांगते माझा पती जेवण बनवतो. कपडे धुतो, तसेच घरातील साफसफाईसुद्धा करतो.
पतीच्या या विचित्र वागण्याला वैतागून समर हिने इजिप्तची राजधानी असलेल्या कैरोमधील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. घटस्फोटासाठी केलेल्या अर्जात ती लिहिते. "माझा पती मला घरात काम करण्याचे स्वातंत्र्य देत नाही. त्यामुळे मी एखाद्या हॉटेलमध्ये राहत असल्यासारखे मला वाटते. मी एक गृहिणी आहे. त्यामुळे अशाप्रकारे जगण्याचा मला कंटाळा आला आहे. आमच्या विवाहाला केवळ दोन आठवडेच झाले आहेत. मात्र माझे पती मला वेळ देण्याऐवजी घरकामामध्येच गुंतलेले असतात. कधीकधी ते जेवण बनवत राहतात. नाहीतर कपडे धूत राहतात."
ती पुढे लिहिते."नवऱ्याच्या अशा वागण्यामुळे मला दिवसभर त्यांना काम करताना पाहुनच दिवस ढकलावा लागतो. त्यांचे दुकान आहे. मात्र दुकानात अनेक कामगार असल्याने ते दिवसातील बराच वेळ घरीच असतात."