नवरा दररोज अंघोळ करत नाही म्हणून पत्नीने मागितला घटस्फोट; कोर्टाने दिला अजब निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 09:29 AM2024-02-05T09:29:30+5:302024-02-05T09:29:52+5:30
कोर्टात साक्षीदार म्हणून अनेक जणांनी दिली साक्ष
Divorce over Bath: आंघोळ करणे आणि स्वतः स्वच्छ राहणे ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. उन्हाळ्यात लोक दिवसातून दोन-तीन वेळा आंघोळ करतात, परंतु थंडीत काही लोक रोज आंघोळ करत नाहीत. बरेच लोक २-३ दिवसांच्या अंतरानेही आंघोळ करतात असे एका अभ्यासातून समोर आले आहे. पण विचार करा की जर कोणी अंघोळ न केल्याने तुमच्यावर गुन्हा दाखल झाला तर? होय, तुर्कस्तानात एका महिलेने असेच काहीसे केले आहे. तिने तिच्या पतीविरुद्ध खटला दाखल केला आहे आणि दावा केला आहे की तो दररोज आंघोळ करत नाही.
काय आहे तक्रार?
आंघोळ करत नसल्यामुळे आणि आठवड्यातून एक-दोन वेळाच दात घासल्यामुळे त्याला घामाचा वास येतो, असा दावा महिलेने केला आहे. ऑडिटी सेंट्रल या वेबसाइटच्या वृत्तानुसार, महिलेने तुर्कस्तानच्या मीडियाला सांगितले की, तिने मुख्यतः वैयक्तिक स्वच्छतेच्या अभावाचे कारण देत तिच्या पतीविरुद्ध घटस्फोटाचा खटला दाखल केला आहे. महिलेच्या वकिलाने अंकारा येथील कौटुंबिक न्यायालयात सांगितले की, तिच्या पतीने किमान ५ दिवस सतत तेच कपडे घातले होते आणि आंघोळही केली नव्हती, ज्यामुळे त्याच्या शरीराला आणि कपड्यांमधून सतत घामाचा वास येत होता.
न्यायालयाने नुकसान भरपाईचे दिले आदेश
वृत्तानुसार, महिलेच्या पतीविरुद्धच्या दाव्यांची पुष्टी करण्यासाठी काही साक्षीदारांनाही न्यायालयात बोलावण्यात आले होते, ज्यात महिलेच्या पतीचे काही ओळखीचे आणि तिच्यासोबत काम करणारे काही सहकारी यांचा समावेश होता. या सर्वांनी महिलेच्या पतीच्या खराब वैयक्तिक स्वच्छतेची पुष्टी देखील केली. त्यानंतर न्यायालयाने महिलेला पतीपासून घटस्फोट मंजूर केला आणि वैयक्तिक स्वच्छतेच्या अभावामुळे पतीला आपल्या घटस्फोटित पत्नीला 16,500 डॉलर्स म्हणजेच सुमारे 13 लाख 69 हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्यास सांगितले.
आठवड्यातून 1-2 वेळाच ब्रश
न्यायालयीन कागदपत्रे आणि साक्षीदारांच्या साक्षीने असे दिसून आले की महिलेचा पती दर ७-१० दिवसातून एकदाच आंघोळ करायचा आणि आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच दात घासायचा. त्यामुळे श्वासोच्छवासाची दुर्गंधी आणि शरीराला दुर्गंधी येत होती. त्यामुळे महिलेचे त्याच्यासोबत राहणे कठीण झाले होते. महिलेच्या वकिलाने एका तुर्कस्तानच्या वृत्तपत्राला सांगितले की, 'पती-पत्नीने संयुक्त जीवनाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत. वर्तनामुळे सामायिक जीवन असह्य झाल्यास, दुसऱ्या पक्षाला घटस्फोटासाठी खटला दाखल करण्याचा अधिकार आहे. आपण सर्वांनी मानवी संबंधांमध्ये सावधगिरी बाळगली पाहिजे. आपले वर्तन आणि स्वच्छता या दोन्हीकडे लक्ष दिले पाहिजे.'