आरंर! महिलेच्या केसामध्ये पक्षानं केलं घरटं, राहिला ८४ दिवस अन् त्यानंतर महिलेचे झाले 'हे' हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 05:45 PM2022-03-31T17:45:55+5:302022-03-31T17:55:53+5:30
लंडनहून घानामध्ये स्थलांतरित झालेल्या हानाची एका लहान पक्षासोबत मैत्री (Woman friendship with Bird) झाली. ही मैत्री इतकी घट्ट आहे की, सध्या जगभर त्यांची चर्चा सुरू आहे.
असं म्हणतात 'मैत्री' (Friendship) हे जगातील सर्वात सुंदर नातं आहे. प्राणी (Animal) असो किंवा माणूस (Human) एकदा लळा लागल्यानंतर ते नातं सहजासहजी तुटत नाही. सर्व सजीवांना प्रेमाची भाषा सहज कळते. असाच काहीसा प्रकार ब्रिटनमध्ये राहणाऱ्या हाना बॉर्न टेलरसोबत (Hannah Bourne Taylor) घडला. लंडनहून घानामध्ये स्थलांतरित झालेल्या हानाची एका लहान पक्षासोबत मैत्री (Woman friendship with Bird) झाली. ही मैत्री इतकी घट्ट आहे की, सध्या जगभर त्यांची चर्चा सुरू आहे.
डेली स्टारनं दिलेल्या वृत्तानुसार, हाना बॉर्न टेलर २०१३ पासून तिच्या पतीसोबत घानामध्ये राहत होती. रॉबिनची नवीन नोकरी असल्यामुळे तो कामात व्यस्त असायचा. अशा परिस्थितीत एकटी पडलेल्या हानानं निसर्गाला (Nature) जवळ केलं. त्यादरम्यान, एका वादळामुळे तिच्या आयुष्यात एका लहान पक्ष्याची एंट्री झाली.
हाना सांगते की, वादळानंतर तिला एक लहान पक्षी जमिनीवर पडलेला दिसला. तो पक्षी त्याच्या सहकाऱ्यांपासून वेगळा झाला होता आणि वादळामुळे (Storm) कदाचित त्याचं घरटंही उडून गेलं होतं. तो पक्षी खूप अशक्त होऊन मरणासन्न अवस्थेत होता. हानानं त्या पक्ष्याला घरी आणलं आणि त्याची काळजी घेण्यास सुरुवात केली. यासाठी तिनं बरीच माहितीदेखील मिळवली. आपल्या या नवीन मित्रासाठी हानानं एक पुठ्ठ्याचं घरटंदेखील (Nest) तयार केलं. किमान 12 आठवड्यांनंतरच पक्ष्याला जंगलात पाठवता येईल, असा सल्ला तज्ज्ञांनी हानाला दिला होता. या काळात हानानं पक्ष्याची काळजी घेतली.
सर्वांत आश्चर्याची गोष्ट म्हणजे हानासोबत राहणारा पक्षी तिलाच आपली आई समजत होता. हानाच्या अंगाखांद्यावर पक्षी झोपत असे. थोडंसं उडण्यास शिकल्यानंतर तो पक्षी दिवसभर हानाच्या मागे फिरायचा आणि तळहातावरून खांद्यावर उडी मारायचा. विशेष म्हणजे त्यानं हानाच्या केसांमध्ये स्वत:चं घरटं (Nest in Hairs) तयार केलं होतं. तो दररोज हानाच्या लांबसडक केसांना घरट्यासारखं गुंडाळून त्यात जायचा. सुमारे ८४ दिवस तो पक्षी हानाच्या केसांतील घरट्यात राहिला.
दोघांनाही एकमेकांचा खूप लळा लागला होता. परंतु, निसर्गाच्या नियमानुसार आणि तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार हानानं त्या पक्ष्याला हळूहळू पक्ष्यांच्या थव्यात (Swarm) नेण्यास सुरुवात केली. त्यानं तीन वेळा थव्यासोबत उडून जाण्याचं टाळलं मात्र, चौथ्यावेळी तो पक्षी इतर पक्ष्यांसोबत उडून गेला. हानानं या पक्ष्यासोबतच्या आपल्या मैत्रीचा किस्सा ट्विटरवर सर्वांसोबत शेअर केला आहे. हाना आणि या पक्ष्याची मैत्री सध्या चर्चेचा विषय झाला आहे. अनेकांनी हानाचं कौतुकही केलं आहे.