निसर्गाचा चमत्कार! महिलेला दोन गर्भाशये, एकाच वेळी वाढत होते दोन भ्रूण; डॉक्टरही झाले अवाक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 02:01 PM2021-12-29T14:01:52+5:302021-12-29T14:02:12+5:30
A miracle of nature! नेब्रास्काची मेगन फिप्सला जन्मताच दोन गर्भाशये होती. हा एक दुर्मिळ प्रकार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
अमेरिकेतील एका महिलेला दोन गर्भाशये (Uteruses) असल्याचे समोर आले. ही दुर्मिळ बाब २२ वर्षांनी समजली आहे, जेव्हा डॉक्टरांनी तिच्या प्रेग्नंसीवेळी सोनोग्राफी केली. हा प्रकार पाहून डॉक्टरही हैराण झाले होते. या महिलेचे नाव मेगन फिप्स (२४) (Megan Phipps) आहे.
'डेली मेल' मध्ये या बाबतचे वृत्त आले आहे. नेब्रास्काची मेगन फिप्सला जन्मताच दोन गर्भाशये होती. हा एक दुर्मिळ प्रकार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, दोन्ही गर्भाशयात भ्रूण वाढत असल्याचे समजताच डॉक्टरांना शॉक बसला. तिच्या दोन्ही गर्भाशयात अर्भके वाढत होती.
याच वर्षी जूनमध्ये तिने दोन गोंडस मुलींना जन्म दिला. मात्र, एकाच दिवशी तिची डिलिव्हरी झाली नाही. एका मुलीचा जन्म आदल्या दिवशी आणि दुसऱ्या मुलीचा जन्म पुढल्या दिवशी झाला. दोन्ही मुलींचे वजन 453 ग्रॅम पेक्षाही कमी होते. परंतू, यावेळी त्यांचे नशीब सोबत नव्हते. मेगनच्या पहिल्या मुलीचा १२ दिवसांनी मृत्यू झाला. तिची दुसरी मुलगी रीस बचावली. मात्र, तिला ४५ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
मेगनला आधीही दोन मुले आहेत. तेव्हा डॉक्टरांना सोनोग्राफीवेळी तिला दोन गर्भाशये आहेत हे समजले होते. मात्र, हेदोन्ही गर्भ तेव्हा एकाच गर्भाशयात होते. यामुळे डॉक्टरांनी दुसरे गर्भाशय सक्रीय नसल्याचे मानले होते. जेव्हा त्याच डॉक्टरांनी दुसऱ्या प्रेग्नन्सीवेळी दोन्ही गर्भाशयात गर्भ वाढत असल्याचे दिसले तेव्हा ते अवाक् झाले. त्यांनी मेगनला दुसऱ्या तज्ज्ञाकडे पाठविले. साईंटिफिक अमेरिकननुसार २००० महिलांमागे एका महिलेला अशी दोन गर्भाशये असतात, परंतू एकाचवेळी दोन्ही गर्भाशयांत गर्भ वाढण्याची शक्यता ही अशा पन्नास दशलक्ष महिलांमध्ये एक अशी असते.