याला म्हणतात नशीब! चिप्स घ्यायला गेली अन् 81 लाखांची लॉटरी लागली, महिला झाली मालामाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 04:47 PM2022-09-30T16:47:40+5:302022-09-30T16:49:11+5:30
एक महिला चिप्सचे पॅकेट घेण्यासाठी दुकानात गेली होती. मात्र, दुकानातून तिने दोन हजार रुपये किमतीचं एक लॉटरीचं तिकीट विकत घेतलं. या लॉटरीच्या तिकिटामुळे महिलेचे नशीबच पालटलं आहे.
आपण श्रीमंत व्हावं, रातोरात भरपूर पैसे मिळावेत अशी अनेकांची इच्छा असते. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एका महिलेचं नशीब फळफळलं आहे. तिला तब्बल 81 लाखांची लॉटरी लागली आहे. एक महिला चिप्सचे पॅकेट घेण्यासाठी दुकानात गेली होती. मात्र, दुकानातून तिने दोन हजार रुपये किमतीचं एक लॉटरीचं तिकीट विकत घेतलं. या लॉटरीच्या तिकिटामुळे महिलेचे नशीबच पालटलं आहे.
लॉटरी लागल्याने ही महिला एका रात्रीत मालामाल झाली आहे. या महिलेला 81 लाख रुपयांची लॉटरी लागली आहे. मात्र टॅक्स वजा करता तिला 57 लाख रुपये मिळणार आहेत. एवढी मोठी रक्कम जिंकल्याचं जेव्हा त्या महिलेला समजलं तेव्हा तिचा यावर विश्वासच बसेना, तिने दोनदा लॉटरी क्रमांक तपासून पाहिला. अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथे राहणारी मारसिया फिने ही चिप्स खरेदी करण्याच्या उद्देशाने 'माईक फूड स्टोअर'मध्ये गेली होती.
मारसिया फिने नेहमी जायची ते दुकान बंद होतं. त्यानंतर ती दुसऱ्या दुकानात गेली आणि तेथे तिने चिप्ससोबतच दोन हजार रुपयांचे लॉटरीचे तिकीट घेतले. जेव्हा तिने या लॉटरीच्या तिकिटाचा क्रमांक जुळला तेव्हा ती थक्क झाली. पिझ्झा हटच्या जनरल मॅनेजर मारसियाने तिचे तिकीट दोनदा तपासले, कारण तिला विश्वास बसत नव्हता की तिने इतकी मोठी रक्कम जिंकली आहे.
मारसिया म्हणाली की ती कदाचित त्या दुकानात गेलीही नसती जर तिचं नेहमीचं दुकान सुरू असतं. हा निव्वळ योगायोग होता की ती तिथे पोहोचली. मारसियाने लॉटरी अधिकाऱ्यांना असेही सांगितले की तिला अजिबात अपेक्षा नव्हती असं काही घडेल याची. ही रक्कम जिंकल्यानंतर ती दोन वर्षे नवीन ठिकाणी राहण्याचा विचार करत आहे. आता तिचे स्वतः चे घर घेण्याचे स्वप्नही पूर्ण होणार असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.