दोन हात गमवावलेली ही महिला आपल्या बाळाचा असा करते सांभाळ, पाहुन डोळ्यात पाणी येईल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 03:47 PM2021-09-20T15:47:19+5:302021-09-20T15:48:19+5:30
सारा तालबी नावाच्या या महिलेला तिच्या जन्मापासून दोन्ही हात नाहीत. मात्र असं असूनही, घरातील सर्व कामं करण्याबरोबरच ती आपल्या दोन वर्षांच्या मुलीचाही व्यवस्थित सांभाळ करते. सारानं तिच्या या अपंगत्वाला कमजोरी नाही तर तिची ताकद बनवली आहे.
काहीजणं स्वत: च्या शारिरक अपंगत्वावर अशी मात करतात की ते इतरांसाठी प्रेरणा बनून जातात. बेल्जियममधील एक महिलाही प्रत्येकासाठी अशीच एक प्रेरणा आहे. सारा तालबी नावाच्या या महिलेला तिच्या जन्मापासून दोन्ही हात नाहीत. मात्र असं असूनही, घरातील सर्व कामं करण्याबरोबरच ती आपल्या दोन वर्षांच्या मुलीचाही व्यवस्थित सांभाळ करते. सारानं तिच्या या अपंगत्वाला कमजोरी नाही तर तिची ताकद बनवली आहे. अपंग असूनही सारा जीवनाच्या सर्व अडचणींना खंबीरपणे तोंड देते. चला तर मन आता साराबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात.
द मिरर या वेबसाईटमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, ३८ वर्षीय सारा हातांनी करता येणारी प्रत्येक गोष्ट तिच्या पायांनी करते. सारा ब्रुसेल्सची आहे. ती म्हणते की ती तिच्या पायांनी सर्व काही करू शकते. साराच्या म्हणते, तिला जन्मापासून हात नसल्याची अजिबात खंत नाही. ती म्हणाली, सुरुवातीला पायांनी काम करताना अडचणी येत होत्या, पण नंतर मला त्याची सवय झाली. सारानं शालेय शिक्षणानंतर इंग्रजी आणि स्पॅनिश भाषांतराचा अभ्यासही केला आहे.
सारा म्हणते, मी घरातील सर्व कामे पायाने करते. यामध्ये केर काढण्यापासून ते भाजी कापण्यापर्यंत, अगदी कम्प्युटरवर काम करण्यापर्यंत सारी कामे मी पायाने करते. साराला लिलिया नावाची दोन वर्षांची मुलगी आहे, तिचा जन्म २०१८ मध्ये झाला. सारा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर खूप अॅक्टिव्ह आहे. या अकाऊंटवर ती तिच्या आणि मुलीसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
साराचं इन्स्टाग्राम अकाउंट पाहिल्यावर चटकन लक्षात येतं की ती आपल्या मुलीची खूप काळजी घेते. मुलीसाठी पायाने अन्न बनवण्यापासून ते मुलीला चमच्याने खाऊ घालण्यापर्यंत सारा सगळी कामं करते. सारा म्हणते की, ती एका मुलीची आई आहे. याबद्दल ती खूप आनंदी आहे. इन्स्टाग्रामवर सारानं तिच्या मुलीसोबत अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यात दोघीही मजा करताना दिसत आहेत.