दोन वर्ष तिनं प्रेमानं रोपटं सांभाळलं अन् पुढे भलतंच घडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 11:53 AM2020-03-04T11:53:16+5:302020-03-04T11:55:58+5:30
ऑस्ट्रेलियातील एक महिला इतर महिलांप्रमाणे फार प्रेमाणे तिच्या रोपट्याला दररोज पाणी घालत होती.
सध्याची ग्लोबल वार्मिंगची वाढती स्थिती बघता झाडं लावणे आणि त्यांना जगवणं फारच गरजेचं झालं आहे. काही लोक तर झाडांचं महत्व जाणून घेऊन शेकडो झाडे लावतात. पण काही असेही असतात ज्यांना त्यांच्या घरातील रोपटं खरं आहे की, खोटं हेही कळत नाही. असाच एक अविश्वसनिय किस्सा समोर आला आहे. हा किस्सा वाचून तुम्हाला हसावं की रडावं हेच कळणार नाही.
ऑस्ट्रेलियातील एक महिला इतर महिलांप्रमाणे फार प्रेमाणे तिच्या रोपट्याला दररोज पाणी घालत होती. हे छोटंसं रोपटं तिने किचनच्या खिडकीत ठेवलं होतं. ती रोज त्याला न विसरता पाणी घालत होती. रोपट्याची पाने स्वच्छ करत होती. हे असंच सतत दोन वर्षे चालत राहिलं. आणि दोन वर्षांनी तिच्या असं लक्षात आलं की, ज्या रोपट्याला ती दोन वर्षांपासून पाणी घालतेय ते रोपटं खरं नसून प्लास्टिकचं आहे.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार या महिलेने सांगितले की, 'माझ्याकडे हे रोपटं दोन वर्षांपासून आहे. या सुंदर रोपट्यावर माझं प्रेम होतं. कारण ते एक परफेक्ट रोपटं होतं. या रोपट्याला ला मी नियमित पाणी घालायचे, त्याची काळजी घ्यायचे. जर दुसरं कुणी माझ्या रोपट्याला पाणी घालत असेल तर मी त्यांना हटकत असे. कारण मला माझ्या रोपट्याची फारच काळजी होती'.
याबाबत स्वत: या महिलेने फेसबुकवर पोस्ट टाकली आहे. त्यात तिने सांगितले की, 'एक दिवस मी ठरवले की, या रोपट्याची कुंडी बदलायची. त्यासाठी दुसरी एक कुंडी घेऊन आले. रोपटं ट्रान्सप्लांट करत असताना माझ्या असं लक्षात आलं की, ज्या रोपट्याला मी २ वर्षांपासून पाणी घालत होते ते प्लास्टिकचं आहे'.
या महिलेची पोस्ट ऑस्ट्रेलिया इनडोअर प्लांट ग्रुपने रिशेअर केली आणि त्यावर लोक त्यांचेही असेच किस्से सांगू लागले. एकाने सांगितले की, 'माझी एक मैत्रिण नेहमीच डेस्कवरील झाडांना पाणी घालत नसे. त्यामुळे अनेक झाडे मेलीत. मग मी तिला एक फेक झाड दिलं. त्या झाडाला ती अनेक महिने पाणी टाकत होती'.