महिलेने दोनदा दिला एकाच बाळाला जन्म, होती विचित्र शारीरिक स्थीती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 05:56 PM2022-05-18T17:56:18+5:302022-05-18T17:58:34+5:30
एका महिलेने 9 महिन्यांच्या प्रेग्नन्सीच्या कालावधीत एकाच बाळाला एकदा नव्हे तर चक्क दोनदा जन्म दिला आहे. महिलेने आपल्या विचित्र प्रेग्नन्सीचा अनुभव सोशल मीडियावर मांडला आहे.
एका वेळी दोन, तीन, चार, पाच अशी मुलं जन्माला आल्याची प्रकरणं तुम्हाला माहिती आहेत. पण एकाच बाळाचा दोन वेळा जन्म झाल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? एका महिलेने 9 महिन्यांच्या प्रेग्नन्सीच्या कालावधीत एकाच बाळाला एकदा नव्हे तर चक्क दोनदा जन्म दिला आहे. महिलेने आपल्या विचित्र प्रेग्नन्सीचा अनुभव सोशल मीडियावर मांडला आहे (Baby Born Twice).
जॅडेन ऐश्लिया (Jaiden Ashlea) नावाच्या महिलेने आपला व्हिडीओ टिकटॉकवर पोस्ट केला आहे. ज्यात तिने एकाच बाळाला दोनदा जन्म दिल्याच्या आपल्या प्रेग्नन्सीबाबत सांगितलं आहे. गर्भावत असताना तिच्या बाळाला अशी समस्या उद्भवली ज्यामुळे तिला या बाळाला दोनदा जन्म देण्याची वेळ ओढावली. बाळाच्या जीवासाठी तिने आपला जीव धोक्यात टाकला आणि दोनवेळा डिलीव्हरीचा धोका पत्करला.19 आठवड्यांच्या प्रेग्नन्सीनंतर महिलेच्या बाळाला स्पाइना बायफिडा डिसॉर्डर असल्याचं समजलं. सुरुवातीला डॉक्टरांनाही आशा नव्हती. बाळ ब्रेनडेड होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. पण काही डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिझेरियनने बाळ बाहेर काढून त्याच्या पाठीची समस्या नीट करून त्याला पुन्हा गर्भात ठेवता येतं. त्यानुसार जॅडेनचीही डिलीव्हरी करण्यात आली.
स दनच्या रिपोर्टनुसार महिलेने सांगितलं, तिच्या बाळाला आधी पोटातून बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर पुन्हा त्याला 11 आठवड्यांसाठी गर्भात ठेवण्यात आलं. त्यावेळी सलाइनने बाळाच्या आसपासचा भागही भरण्यात आला. जेणेकरून एम्नियॉटिक फ्लुइड तयार होईल. याचा अर्थ मुलाला जन्म दिल्यानंतर पुन्हा त्याच मुलासह ती प्रेग्नंट झाली. 11 आठवड्यांनंतर पुन्हा बाळाला ऑपरेट करून बाहेर काढण्यात आलं.
काय आहे स्पाइना बायफिडा?
जन्मजात होणारा स्पायना बायफिडा या आजारामुळे बाळाला चालता-फिरता येत नाही. myupchar.com चे डॉ. प्रदीप जैन यांनी सांगितलं, स्पायना बायफिडामध्ये पाठीचा मणका आणि मेरुदंड व्यवस्थित विकसित होत नाही. या दोषाला न्यूरल ट्यूब दोष या श्रेणीत सामील केलं गेलं आहे. ही ट्यूब म्हणजे भ्रूणची एक संरचना आहे जी बाळाचं मस्तक आणि मेरुदंड विकसित करते.
जन्म झाल्यावर किंवा त्यानंतर स्पायना बायफिडाची लक्षणं बाळात दिसू लागतात त्यात पायाला लकवा होणे, मल-मूत्र विसर्जनावर नियंत्रण नसणे, त्वचा असंवेदनशील असणं, फिट्स येणं, पाय आणि कंबरेच्या आकारात विकृती आणि पाठीचा कणा वाकणं इत्यादी सामील आहेत. स्पायना बायफिडामध्ये मज्जारज्जूमध्ये संक्रमण होण्याचा धोका असतो.
स्पाइना बायफिडाचं कारण काय?
संशोधक असे मानतात की बाळाच्या परिवारातील स्वास्थ्य समस्या, वातावरण आणि आईच्या शरीरातील फॉलिक अॅसिडची कमतरता या गोष्टी कारणीभूत असतात. सोबतच जर गर्भावस्थेच्या काळात फिट्स येण्याची औषधं घेतली तरी बाळाला न्यूरल ट्यूब डिफेक्ट होण्याची शक्यता वाढते. हेच नाही तर ज्या महिलांमध्ये रक्त शर्करा अनियंत्रित असते त्यांच्या बाळाला सुद्धा स्पायना बायफिडा होण्याचा धोका असतो. गर्भवती होण्याअगोदर जर आई लठ्ठ असेल तर तेदेखील बाळाला न्यूरल ट्यूब दोष होण्याचे कारण ठरू शकते.
स्पाइना बायफिडावर उपचार काय?
स्पायना बायफिडामध्ये शस्त्रक्रियेची आवश्यकता पडते. या शस्त्रक्रिया जन्मापूर्वी किंवा जन्मानंतर केल्या जातात. गर्भावस्थेच्या 24व्या आठवड्यात शत्रक्रिया करून स्पायना बायफिडा ठिक करता येतो. या शस्त्रक्रियेमध्ये डॉक्टर आईच्या गर्भाशयाला उघडून बाळाच्या मेरुदंडाला ठिक करतात. याने जन्मसंबंधी दोष होण्याचा धोका कमी होतो. पण या प्रक्रियेमध्ये जास्त धोका असतो. बाळ लवकर जन्माला येण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
जन्मानंतरच्या मेनिनगोसील शस्त्रक्रियेत मेनिन्जेसला योग्य ठिकाणी केले जाते आणि मोकळ्यापेशी बंद केल्या जातात. या स्थितीत मेरुदंड नैसर्गिकरित्या वाढतो त्याने मज्जारज्जूला धक्का न लागू देता अडचण सहज दूर करता येते.
स्पाइना बायफिडा बचाव कसा करता येईल?
स्पायना बायफिडापासून बचाव मुश्किल आहे पण गर्भावस्थेच्या काळात फॉलिक अॅसिड घेतलं, वेळेवर चाचण्या केल्या तर या समस्येपासून वाचता येते. फॉलिक अॅसिड आणि अन्य जीवनसत्व घेण्यानं जन्मदोष निर्माण होण्याचा धोका कमी होतो.