'ती'चा जुळा भाऊ ११ आठवड्यांनी जन्माला आला; जाणून घ्या 'हा' चमत्कार कसा झाला!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 12:47 PM2019-08-22T12:47:32+5:302019-08-22T13:14:11+5:30
अनेकदा हॉस्पिटलमध्ये अशा केसेस येत असतात की, त्या पाहून स्वत: डॉक्टरही हैराण होतात. गेल्या काही दिवसांपूर्वी कझाकस्तान अशीच एक आश्चर्यकारक घटना घडली.
अनेकदा हॉस्पिटलमध्ये अशा केसेस येत असतात की, त्या पाहून स्वत: डॉक्टरही हैराण होतात. गेल्या काही दिवसांपूर्वी कझाकस्तान अशीच एक आश्चर्यकारक घटना घडली. इथे एका २९ वर्षीय महिलेने एकदा डिलिव्हरी झाल्यानंतर पुन्हा केवळ ११ आठवड्यातच दुसऱ्या बाळाला जन्म दिला. महत्त्वाची बाब म्हणजे तिने जुळ्या बाळांना जन्म दिला. मेडिकल विश्वात अशी घटना ५० लाखात एकासोबत घडते.
७ वर्षांच्या मुलीची आई आहे लिलिया
लिलिया कोनोवालोवा असं या महिलेचं नाव असून ती उत्तर कझाकस्तानमध्ये राहणारी आहे. डॉक्टर्स लिलियाच्या या डिलिव्हरीसाठी आधीपासूनच तयार होते. कारण त्यांना या अनोख्या केसबाबत आधीपासून माहीत होतं. लिलियाला याआधी एक ७ वर्षांची मुलगी आहे. ७ वर्षांपूर्वी जेव्हा पहिल्यांदा ती प्रेग्नेंट होती, तेव्हाच डॉक्टरांना कळाले होते की, लिलियाला दोन गर्भाशय आहेत.
वेळेआधीच झाला दुसऱ्या मुलीचा जन्म
लिलिया जेव्हा दुसऱ्यांदा प्रेग्नेंट राहिती तेव्हाच ती जुळ्यांना जन्म देणार हे कळाले होते. आश्चर्याची बाब म्हणजे हे दोन्ही बाळ वेगवेगळ्या गर्भाशयात वाढत होते. गेल्या २४ मे रोजी लिलियाने सहा महिन्यांच्या प्रेग्नेंसीनंतर एका मुलीला जन्म दिला. ती केवळ २५ आठवड्यांची होती आणि तिचं वजन केवळ ८५० ग्रॅम इतकं होतं. तर तिचा जुळा भाऊ त्याच्या वेळेनुसार जन्माला आला. दोन्ही बाळांची स्थिती चांगली आहे.
कझाकस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच
डॉक्टर्स सांगतात की, कझाकस्तानचया इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली की, वेगवेगळे वेळेला जुळ्या बाळांचा जन्म झाला. दोन्ही जुळ्या भावा-बहिणीत ११ आठवड्यांचं अंतर आहे.