2 कोटी रूपयांसाठी महिलेने मोडलं लग्न, मग तरूणाने उचललं हे पाउल...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 02:22 PM2023-01-11T14:22:36+5:302023-01-11T14:23:22+5:30
China : इथे लियु नावाच्या महिलेने झांग नावाच्या व्यक्तीला लग्नाचं आश्वासन दिलं होतं. दोघांचं नातं 2015 मध्ये ठरलं होतं. त्यानंतर दोन वर्षानी त्यांनी एक करार केला.
China : एका महिलेने लग्नाचं आश्वासन दिलं होतं. नंतर कपलचा साखरपुडा झाला. त्यानंतर होणाऱ्या पतीकडून महिलेने साधारण 2 कोटी रूपये घेतले. कारण कपल लग्नाआधी एक करार साइन केला होता. ज्यानुसार, होणाऱ्या पतीला तिच्या मुलीच्या शिक्षणासाठी पैसे द्यायचे होते. पण नंतर महिलेने लग्न मोडलं आणि पैसे परत देण्यासही नकार दिला. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलं. आता कोर्टाने महिलेला पैसे परत देण्याचा आदेश दिला आहे.
ही घटना चीनच्या शांघाय शहरातील आहे. इथे लियु नावाच्या महिलेने झांग नावाच्या व्यक्तीला लग्नाचं आश्वासन दिलं होतं. दोघांचं नातं 2015 मध्ये ठरलं होतं. त्यानंतर दोन वर्षानी त्यांनी एक करार केला. यानुसार जर लियुने झांगसोबत लग्न केलं, तर झांग लियुच्या मुलीच्या शिक्षणासाठी 1 मिलियन युआन म्हणजे 1.21 कोटी रूपये देणार. त्याने लग्नाआधी 1.6 मिलियन युआन म्हणजे 1.94 कोटी रूपये दिले होते. नंतर 2018 मध्ये लियु म्हणाली की, तिच्या वडिलांनी या लग्नाला नकार दिला आहे.
लग्न मोडल्यानंतर झांगने तिच्याकडे पैसे परत मागितले. पण तिने नकार दिला. त्यानंतर झांगकडे कोर्टात जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्याने तर तसे तिला 1.94 कोटी रूपये दिले होते, पण त्याच्याकडे 1 कोटी रूपये दिल्याचाच पुरावा होता. ज्यामुळे कोर्टाने तिला 1 कोटी रूपये परत करण्याचा आदेश दिला. साऊथ चायना मॉर्निंग रिपोर्टनुसार, लियुला जेव्हा हे समजलं की, तिच्या विरोधात केस करण्यात आली आहे. तेव्हा ती लग्न करण्यासाठी तयार झाली. पण यावेळी झांगने नकार दिला.
जेव्हा कोर्टात याची सुनावणी झाली तेव्हा झांगच्या बाजूने निर्णय लागला. त्यानंतर लियुला पैसे परत करण्याचा आदेश देण्यात आला. सध्या या घटनेची चीनी मीडियात खूप चर्चा होत आहे.