महिलेनं रुग्णालयातून केली नवजात बाळाची चोरी, मात्र १७ वर्षांनी सत्य आलं बाहेर....पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 04:14 PM2022-03-28T16:14:40+5:302022-03-28T16:17:36+5:30
या घटनेत ज्या बाळाची चोरी झालेली (Woman Kidnap Baby Girl from Hospital) ती मुलगी आता मोठी झाली असून तिने आपल्याला चोरी करणाऱ्या महिलेचीच बाजू घेतली आहे.
एखादी व्यक्ती हॉस्पिटलमधून नवजात बाळाला चोरते आणि नंतर त्याला स्वतःच्या मुलाप्रमाणे वाढवते, असं तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये (Film Story) पाहिलं असेल. यानंतर अनेक वर्षांनंतर मुलाला सत्य कळतं आणि मग नायक क्लायमॅक्समध्ये आपल्या खऱ्या पालकांना भेटतो. नुकतंच अमेरिकेतही असंच प्रकरण समोर आलं आहे. मात्र या घटनेत ज्या बाळाची चोरी झालेली (Woman Kidnap Baby Girl from Hospital) ती मुलगी आता मोठी झाली असून तिने आपल्याला चोरी करणाऱ्या महिलेचीच बाजू घेतली आहे.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, अलेक्सिस मनिगोचा जन्म १९९८ मध्ये फ्लोरिडा येथील जॅक्सनविले येथील रुग्णालयात झाला होता. तेव्हा तिचं नाव कामिया मोबले होतं. तिच्या जन्मानंतर काही तासांनी ग्लोरिया विल्यम्सने तिची चोरी केली. पण १९ वर्षांनंतर २०१७ मध्ये हे उघड झालं की अलेक्सिसची खरी आई शनारा मोबली आहे, जी बाळाच्या जन्माच्या वेळी फक्त १६ वर्षांची होती.
तुम्हाला वाटेल की यानंतर, जेव्हा मुलीला सत्य समजलं, तेव्हा ती ग्लोरियावर रागावली असेल आणि आपल्या खऱ्या आईपासून आपल्याला दूर केल्यानं तिचा तिरस्कार करू लागली असेल. पण तसं घडलं नाही. झालं असं की १९९८ मध्ये ग्लोरिया एक परिचारिका म्हणून रुग्णालयात शिरली आणि तिने हे बाळ चोरलं. तिने बाळाला आपल्यासोबत साउथ कॅरोलिनाला नेलं आणि तिला तिच्या स्वतःच्या मुलीसारखं सांभाळलं. २०१७ मध्ये नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रनने केलेल्या तपासणीत असं आढळून आले की दक्षिण कॅरोलिना येथील अलेक्सिसची जन्मतारीख हरवलेल्या बाळाशी मिळतीजुळती आहे, परंतु तिचं नाव हरवलेल्या बाळापेक्षा वेगळं आहे. मुलीची डीएनए चाचणी केली असता ती शनारा मोबली यांची मुलगी असल्याचं स्पष्ट झालं.
त्यानंतर ग्लोरियाला तुरुंगात टाकण्यात आलं. मात्र, तेव्हापासून अलेक्सिस ग्लोरियाला तुरुंगातून सोडण्यासाठी प्रयत्न करत आहे. ग्लोरियाला कोर्टाने १८ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे आणि आता काहीच वर्षे झाली आहेत, तिने कोर्टात शिक्षा माफ करण्याची विनंती केली आहे. ग्लोरियाने अलेक्सिसला मोठ्या प्रेमाने वाढवलं. आता अलेक्सिस २३ वर्षांची आहे आणि तिच्या खऱ्या पालकांना पुन्हा भेटली आहे, परंतु असं असूनही तिला ग्लोरियाची सुटका करायची आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तिने न्यायाधीशांना पत्रही लिहिलं होतं. तिने चिठ्ठीमध्ये लिहिलेलं की ग्लोरिया तिची दुसरी आई आहे आणि ती तिच्यावर खूप प्रेम करते.