महिलेनं फ्लाईटमध्ये केलं असं काम की करावी लागली इमरजन्सी लँडिंग, प्रवाशांमध्ये एकच गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2022 10:57 AM2022-04-03T10:57:14+5:302022-04-03T10:57:26+5:30
एका घटनेत कॅथरीन नावाच्या महिलेने विमान प्रवासादरम्यान इतका गोंधळ आणि तमाशा केला की शेवटी एअरलाइन्सला इमर्जन्सी लँडिंग (Emergency Landing of Flight) करावं लागलं.
प्रवासादरम्यान तुमच्यामुळे इतर कोणाला त्रास होणार नाही, हे लक्षात ठेवणंही खूप गरजेचं आहे. ही देखील एक सभ्यता आहे. मात्र काही लोक असा विचार करत नाहीत. त्यांना फक्त आपली सोय आणि गैरसोय, आरामात प्रवास आणि आपला हट्ट पूर्ण करून घेणं, इतकंच माहिती असतं. ते आपलं म्हणणं खरं करूनच शांत बसतात. मात्र या लोकांमुळे इतरांनाही त्रास सहन करावा लागतो.
अशाच एका घटनेत कॅथरीन नावाच्या महिलेने विमान प्रवासादरम्यान इतका गोंधळ आणि तमाशा केला की शेवटी एअरलाइन्सला इमर्जन्सी लँडिंग (Emergency Landing of Flight) करावं लागलं. या घटनेनंतर महिलेला फ्लाइटमधून उतरवण्यात आलं आणि त्यानंतर तिच्यावरही बंदीही घालण्यात आली. एअरलाइनने घेतलेला कठोर निर्णय आणि सगळीकडे अपमान झाल्यानंतर कॅथरीनने सोशल मीडियाद्वारे माफी मागितली. तसंच या वागण्यामागे मानसिक आजार असल्याचं कारण दिलं.
कॅथरीनच्या गोंधळानंतर फ्लाइट पुन्हा मागे वळवावी लागली आणि मँचेस्टर ते तुर्की विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागले. ही महिला आधीपासून भांडणाच्या मूडमध्ये दिसत होती, याशिवाय तिने ड्रिंकही केलं होतं. यामुळे ती जास्तच गोंधळ घातला. काही प्रवाशांनी तिच्या या कृत्याचा व्हिडिओ बनवून व्हायरल केला. नंतर माफी मागून महिलेनं सांगितलं की ती मानसिक आजाराशी झुंज देत आहे. त्यादिवशी ती आपलं औषध न घेताच प्रवासाला निघाली होती. त्यामुळे, हे सगळं घडलं. तिने हेदेखील सांगितलं की ती कधीच एकटी प्रवास करत नाही. तिच्यासोबत डॉक्टर असतात, मात्र पहिल्यांदा तिने हट्ट करून एकटीने प्रवास केला. मात्र भलतंच घडलं.
कॅथरीन बुश गेल्या महिन्यात मँचेस्टरहून तुर्कीला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये एअरलाइन कर्मचाऱ्यांवर ओरडताना दिसली होती. यानंतर विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. मात्र नंतर तिने व्हिडिओ शेअर करत माफी मागितली. कॅथरीनने सांगितलं की ती मनोविकारविरोधी औषध घेते, परंतु प्रवासापूर्वी ती औषध न घेता गेली होती. आता तिला आपल्या या चुकीचा पश्चाताप होत असल्याचं तिने म्हटलं. कॅथरीनने सांगितलं की जेव्हा ती आक्रमक झाली होती तेव्हा कर्मचाऱ्यांनी तिला थांबवण्यासाठी तिचा हात धरला, ज्यामुळे तिचा पारा आणखीच चढला आणि तिने हे सगळं केलं.