नोकरी सो़डून 'कतरिना' झाली सफाई कर्मचारी; फ्रीमध्ये दुसऱ्यांचं घर करते स्वच्छ, 'हे' आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 12:44 PM2022-11-07T12:44:31+5:302022-11-07T12:53:20+5:30
कतरिना मनापासून हे काम करत आहे. आता लोकही तिच्या कामाचं भरभरून कौतुक करू लागले आहेत. ती साफसफाई करण्यासाठी एकही पैसा कोणाकडून घेत नाही.
प्रत्येकाला चांगली नोकरी हवी असते पण फिनलँडच्या कतरिनाची गोष्टच वेगळी आहे. आधी चांगली नोकरी मिळवली आणि काही दिवसांनी नोकरी सोडून सफाई कर्मचारी झाली. आता ती अस्वच्छ झालेली घरं फुकटात साफ करत जगभर फिरत आहे. लोकांमध्ये 'क्लिनिंगची राणी' म्हणूनही ती प्रसिद्ध आहे. ती 2 दिवसात कोणतेही घर पूर्णपणे साफ करते. कतरिना ऑरी (वय २९ वर्षे) ही मूळची फिनलँडची. कतरिनाचे म्हणणे आहे की, ती नोकरी करताना खूश नव्हती. तिला साफसफाईची आवड आहे, म्हणून तिने आपली नोकरी सोडून स्वच्छतेसाठी जगभर फिरण्याचा निर्णय घेतला.
कतरिना मनापासून हे काम करत आहे. आता लोकही तिच्या कामाचं भरभरून कौतुक करू लागले आहेत. ती साफसफाई करण्यासाठी एकही पैसा कोणाकडून घेत नाही. साफसफाई करून ती लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय झाली आहे. यासोबतच तिची सोशल मीडियावर देखील जादू पाहायला मिळत आहे. तिथेही तिचा मोठा चाहता वर्ग आहे. टिकटॉकवर तिचे 78 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
लोकप्रियतेमुळे तिला आता स्पॉन्सरशिप मिळाली आहे. टिकटॉकवर पोस्ट केलेल्या साफसफाईच्या व्हिडिओमधून कतरिना जे काही कमावते, त्यातून ती तिचा प्रवास खर्च करते. 2 दिवसात संपूर्ण घर साफ करते, कतरिना म्हणते 'मला घाणीची भीती वाटत नाही, पण घाण मला घाबरते.' ती दोन दिवसात कोणतेही अस्वच्छ घर पूर्णपणे साफ करते. तीन मुलांच्या आईच्या घराची प्रथम साफसफाई करून तिने हे काम सुरू केलं. सुरुवातीला प्रवास खर्चाचे व्यवस्थापन करणे थोडे आव्हान होते, परंतु आता कोणतीही अडचण नाही.
कतरिनाने 2021 मध्ये नोकरी सोडली. नोकरी सोडल्यानंतर तिने आपले संपूर्ण आयुष्य स्वच्छतेकडे वाहून घेतले आहे. ती हे तिचं करिअर असल्याचं म्हणते. या कामामुळे आता तिच्याकडे अनेक सफाई उत्पादनांच्या जाहिरातीही आहेत. अशाप्रकारे कतरिना स्पॉन्सरशिपमधून भरपूर पैसे कमवते. याशिवाय ती सोशल मीडियावर साफसफाईचे व्हिडीओ टाकून देखील पैसे कमवते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"