पाहवला गेला नाही घटस्फोटीत पतीचा आनंद, 'तिने' पुन्हा लग्न करून 'असा' काढला काटा!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 02:49 PM2020-03-16T14:49:44+5:302020-03-16T14:50:37+5:30
एका महिलेला तिच्या घटस्फोटीत पतीचा आनंद पाहवला गेला नाही. या महिलेने असा काही कारनामा केला की, तिला १० वर्षांचा तुरूंगवास आणि १.२५ कोटी रूपयांचा दंडही ठोठावला जाऊ शकतो.
(सांकेतिक छायाचित्र)
अनेकदा गमतीने असं म्हटलं जातं की, नातेवाईकांना इतर सगळ्या गोष्टींनी संपन्न असलेल्या नातेवाईकांबाबत ईर्ष्या वाटते. म्हणजे त्यांना त्यांच्याच नातेवाईकांचं यश पाहवत नाही. आता पत्नी सुद्धा आपल्या पतीचं यश आणि आनंदही पाहवला जात नाही. पत्नीच्या अशाप्रकारच्या घटना कमीच ऐकायला मिळतात. अशीच एक घटना फ्रान्समध्ये घडली आहे. इथे एका महिलेला तिच्या घटस्फोटीत पतीचा आनंद पाहवला गेला नाही. या महिलेने असा काही कारनामा केला की, तिला १० वर्षांचा तुरूंगवास आणि १.२५ कोटी रूपयांचा दंडही ठोठावला जाऊ शकतो.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ५८ वर्षीय महिला फ्रान्समधील एका कोर्टात न्यायाधीश पदावर राहिलेली आहे. या महिलेने आपल्या कायद्याच्या माहितीचा फायदा उचलत कागदोपत्री घटस्फोटीत पतीसोबत पुन्हा लग्न केलं. धक्कादायक बाब म्हणजे तिच्या घटस्फोटीत पतीला याबाबत काहीच माहीत नव्हतं.
असे सांगितले जात आहे की, घटस्फोटीत पतीला त्याच्या प्रेयसीसोबत लग्न करता येऊ नये म्हणून महिलेने हा सगळा खटाटोप केला. त्याच्या प्रेयसीसाठीच या पुरूषाने न्यायाधीश पत्नीला घटस्फोट घेऊन सोडलं होतं. याचाच सूड घेण्यासाठी महिलेने हा कारनामा केला.
(Image Credit : mohamed_hassan/Pixabay)
रिपोर्ट्सनुसार, जेव्हा या महिलेचा घटस्फोटीत पती प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी कोर्टात रजिस्ट्रेशन करायला गेला तेव्हा याचा खुलासा झाला. त्याला समजले की, त्याच्या आधीच्या पत्नीने मार्च २०१९ मध्ये त्याच्यासोबत कागदोपत्री पुन्हा लग्न केलं. त्यानंतर त्याने महिलेविरोधात तक्रार दाखल केली.
कोर्टात न्यायधीश राहिलेल्या महिलेने पुन्हा केलेलं लग्न बेकायदेशीर ठरवण्यात आलं आणि पीडित व्यक्तीला सांगितलं की, तो कधीही प्रेयसीसोबत लग्न करू शकतो. त्याला त्याचं जीवन त्याच्या पद्धतीने जगण्याचं स्वातंत्र्य आहे. तर आरोपी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.