धक्कादायक! कबुतरांना दाणे टाकणाऱ्या महिलेला पालिकेने ठोठवला २.५० लाखांचा दंड, पण का?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 04:15 PM2024-04-02T16:15:46+5:302024-04-02T16:16:38+5:30
राहत्या घरातून हाकलून लावण्यासाठी न्यायालयीन कारवाईचाही पालिकेने दिला इशारा
fine for Feeding pigeons and seagulls: प्राण्यांना आणि पक्ष्यांना दाणा-पाणी देण्याची अनेकांना सवय असते. पक्ष्यांसाठी उन्हाळ्यात आपल्या घराच्या बाल्कनीत किंवा गच्चीत पाण्याने भरलेले छोटेसे भांडे ठेवा असे बरेचदा प्राणीप्रेमींकडून आवाहन केले जाते. तसेच, रस्त्यांवर आणि गार्डनमध्ये कबुतरांसाठी दाणे टाकले जातात. कित्येक लोक आपल्या गच्चीत थोड्या प्रमाणात अन्नाचे दाणे ठेवून देतात जेणेकरून पक्ष्यांना थोडेसे खाणे मिळावे. पण कबुतराला दाणे टाकल्याने जर तुम्हाला शिक्षा किंवा दंड ठोठवला गेला तर? त्यातही हा दंड पालिकेकडून ठोठवला असेल आणि त्याची रक्कम सुमारे अडीच लाख रुपयांपर्यंत असेल तर... तुम्हालाही नक्कीच धक्का बसेल ना... असाच एक प्रकार एका वृद्ध महिलेसोबत घडल्याचे उघड झाले आहे.
एक ९७ वर्षांची वृद्ध महिला इंग्लंडमध्ये वास्तव्यास असून तिचे नाव अॅनी सॅगो असे आहे. मिररच्या रिपोर्टनुसार, या महिलेला कबुतरांना दाणे टाकल्यामुळे तब्बल अडीच लाख रूपयांचा दंड पालिकेकडून ठोठवला गेला आहे. सर्वप्रथम या महिलेला १०० पौंड म्हणजे सुमारे १० हजार रुपयांचा दंड ठोठवला जाईल असे सांगितले जात होते. पण प्रत्यक्षात मात्र तिला आता असे सांगण्यात आले आहे की हा दंड वाढून तब्बल २५०० पौंड म्हणजेच सुमारे २ लाख ६२ हजारांवर पोहोचला आहे.
वास्तविकदृष्ट्या, हा वाद गेल्या वर्षी सुरु झाला होता. या वृद्ध महिलेच्या शेजाऱ्यांनी नगर पालिकेत तक्रार दाखल केली होती की ही महिला कबुतर आणि सीगल पक्ष्यांना बोलवत होती आणि दाणे घालत होती. त्यानंतर नगरपालिकेने तिला लेखी चेतावणी दिली, की तिचे 'असामाजिक वर्तन' थांबले नाही तर तिला £100 दंड आकारला जाईल. मात्र, या इशाऱ्यानंतरही महिलेने पक्ष्यांना दाणे टाकणे थांबवले नाही. अशा परिस्थितीत पालिकेने तिला 2,500 पौंडांचा दंड ठोठावला, त्यासोबतच त्या महिलेला आणि तिच्या मुलाला त्यांच्याच राहत्या घरातून हाकलून देण्यासाठी न्यायालयीन कारवाईची धमकीही दिली आहे.
रिपोर्ट्सनुसार, ॲनी निवृत्त संगीत शिक्षिका आहेत. या संदर्भात ती म्हणते की, त्यांच्या बागेत पक्षी येणे आणि त्यांना खाणे टाकणे हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद आहे. परंतु पालिकेचे म्हणणे आहे की पक्षी मोठ्या संख्येने येत असल्याने परिसर प्रदूषित होत आहे. त्याच परिसरात राहणाऱ्या इतर लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांच्या मालमत्तेचे नुकसान होत आहे. त्यामुळे पालिकेने महिलेच्या या सवयीला समाजविघातक वर्तन ठरवले असून दंडाबरोबरच न्यायालयीन कारवाईचाही इशारा दिला आहे.