नवऱ्याशी गोड बोलून विकायला लावली किडनी, सगळे पैसे घेऊन प्रियकरासोबत फरार झाली पत्नी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 15:20 IST2025-02-05T15:18:45+5:302025-02-05T15:20:22+5:30
पश्चिम बंगालच्या हावडामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत असंच काहीसं झालंय. या व्यक्तीच्या पत्नीनं त्याची अशी काही फसवणूक केली की, त्याला मोठा धक्का बसला आहे.

नवऱ्याशी गोड बोलून विकायला लावली किडनी, सगळे पैसे घेऊन प्रियकरासोबत फरार झाली पत्नी!
कधी आपलेच लोक आपल्यासोबत असं काही वागतात की, त्यावर आपला विश्वासच बसत नाही. ज्या व्यक्तीवर आपण सगळ्यात जास्त विश्वास ठेवतो तिच व्यक्ती आपल्याला इतका मोठा दगा देते की, ज्याचा कधी स्वप्नातही विचार केला नसेल. पश्चिम बंगालच्या हावडामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत असंच काहीसं झालंय. या व्यक्तीच्या पत्नीनं त्याची अशी काही फसवणूक केली की, त्याला मोठा धक्का बसला आहे. महिलेनं घराची स्थिती सुधारण्यासाठी पतीची किडनी विकली आणि त्यातून आलेले पैसे ते घेऊन प्रियकरासोबत फरार झाली.
पती-पत्नीचं नातं हे विश्वासावर टिकून असतं. दोघेही सात जन्म एकमेकांची साथ देण्याची शपथ घेत असतात. पण काही लोक असे असतात ज्यांना सात जन्म सोबत राहण्याची शपथ मोडायला काहीच वेळ लागत नाही. एका पत्नीनं पतीसोबत असं काही केलं जे तो आयुष्यभर विसरू शकणार नाही आणि पत्नीवर विश्वास ठेवण्याचा त्याला पश्चाताप होईल. पत्नीच्या बोलण्यात येऊन पतीनं वर्षभर किडनीसाठी कस्टमर शोधला आणि बेकायदेशीरपणे त्यानं त्याची किडनी सुद्धा विकली. पण त्याच्या हाती एक रूपयाही लागला नाही.
किडनी विकून प्रियकरासोबत फरार
मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिलेनं पतीला आपल्या गोड बोलण्यात ओढून किडनी विकण्यासाठी तयार केलं. पत्नीनं त्याला सांगितलं की, किडनी विकून इतके पैसे मिळतील की, घराची स्थिती पूर्ण बदलेल. १० वर्षांची मुलगी मोठी होऊन चांगलं शिकेल आणि तिचं लग्नही होईल. पतीही आपल्या पत्नीच्या बोलण्यात अडकला आणि वर्षभर किडनी विकण्यासाठी कस्टमर शोधत राहिला. किडनी विकणं बेकायदेशीर आहे. अशात ब्लॅक मार्केटमध्ये तीन महिन्याआधी त्याची किडनी विकली गेली. याबदल्यात त्याला १० लाख रूपये मिळाले. पण त्याला याचा अजिबात अंदाज नव्हता की, स्वत:ची किडनी विकून त्याच्या हाती एक रूपयाही लागणार नाही.
पतीची किडनी विकून मिळालेले पैसे घेऊन महिला तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. पतीचा आरोप आहे की, पत्नी प्रियकराला फेसबुकच्या माध्यमातून भेटली होती आणि दोघांनी मिळून त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. पतीनं पोलिसांच्या मदतीनं पत्नीला शोधलं आणि मुलीसोबत तिला परत आणण्यासाठी गेला. पती आणि मुलगी येत असल्याचं पाहून पत्नीचं दरवाजा बंद केला आणि तिनं घटस्फोटाची धमकी दिली. पत्नीला आपल्या पतीवर अत्याचाराचा आरोप लावत घटस्फोट हवा आहे. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि प्रकरण कोर्टात आहे.