महिलेने बॅंकेतून लंपास केले कोट्यावधी रूपये, 25 वर्ष प्लास्टिक सर्जरी करून फिरत राहिली आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 09:15 AM2023-01-24T09:15:09+5:302023-01-24T09:15:52+5:30
Bank Clerk Steals Crores: ही घटना चीनच्या एका शहरातील आहे. चीनी मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिलेचं नाव चेन येल आहे आणि ती चीनच्या एका सरकारी बॅंकेत क्लार्क म्हणून काम करत होती.
Bank Clerk Steals Crores: चोरी किंवा दरोड्याच्या अनेक धक्कादायक घटना नेहमीच समोर येत असतात. अनेकदा बॅंकांमध्ये तिथे काम करणारे अधिकारीच मोठी चोरी करतात आणि फरार होतात. इतकंच काय तर हे चोर अधिकारी अनेक वर्ष सापडतही नाहीत. अशीच एक घटना समोर आली आहे. एका महिला अधिकाऱ्याने तिच्याच बॅंकेतून कोट्यावधी रूपये लंपास केले आणि आता ती 25 वर्षानंतर पकडली गेली.
ही घटना चीनच्या एका शहरातील आहे. चीनी मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिलेचं नाव चेन येल आहे आणि ती चीनच्या एका सरकारी बॅंकेत क्लार्क म्हणून काम करत होती. पण ती अचानक गायब झाली. नंतर समजलं की, बॅंकेत चोरी झाली आहे आणि जी महिला क्लर्क गायब झाली आहे तिनेच बॅंकेतून 5 कोटी रूपये लंपास केले आहेत.
इतकंच नाही पैसे चोरी करून गायब झाल्यानंतर महिलेने प्लास्टिक सर्जरी करून चेहरा बदलून घेतला. त्यानंतर तिने घर खरेदी केलं आणि ती आरामात जगत होती. तिने काही पैसे गुंतवले आणि बाकीचे पैसे भाऊ-बहिणीच्या खात्यात टाकले.
इकडे बॅंकेत झालेल्या चोरीचा तपास सुरूच होता. पोलीस बरीच वर्ष या महिलेचा शोध घेत होते. पण महिला त्यांच्या हाती लागली नाही. रिपोर्टनुसार, असं करत करत 25 वर्षाचा काळ उलटून गेला. पण नुकतीच या चोरीचा तपास करणाऱ्या एका अधिकाऱ्याला ही महिला दिसली.
जेव्हा अधिकाऱ्याला या महिलेवर संशय आला तेव्हा त्याने टीमला सूचना दिली आणि महिलेला अटक केली. महिलेने आधी तर काही सांगितलं नाही पण नंतर जेव्हा सगळे पुरावे तिच्या विरोधात दिसले तेव्हा तिने तिचा गुन्हा कबूल केला. महिलेने अनेक धक्कादायक खुलासे केले. तिने हेही सांगितलं की, तिने ही चोरी कशी केली आणि कशी ती अचानक गायब झाली. सध्या महिलेला अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.