बापरे! Dentist चा खर्च परवडेना; महिलेने स्वत:चं ११ दात उखडून टाकले, ‘अशी’ झाली अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 10:41 AM2021-10-08T10:41:16+5:302021-10-08T10:41:51+5:30
ही घटना ब्रिटनच्या लंडनमधील आहे. याठिकाणी डेनिएल वाट्स(Danielle Watts) नावाच्या महिलेने खासगी डेंटिस्टकडे जाण्यास पैसे नाहीत म्हणून स्वत:चे ११ दात उखडले आहेत.
मानवी शरीरात दातांच्या समस्येने बहुतांश जण त्रस्त असतात. दातांमध्ये वेदना झाल्याने ते खूप त्रासदायक ठरतं. त्यामुळे दातांवर उपचार करण्यासाठी डेंटिस्टकडे जावं लागतं. परंतु एका ४२ वर्षीय महिलेला जेव्हा दाताची समस्या जाणवली तेव्हा तिने जे काही केले ते पाहून प्रत्येकजण हैराण झाला. महिलेने डेंटिस्टकडे जाण्याऐवजी स्वत:चं ११ दात उखडून टाकले. काय आहे हा प्रकार, जाणून घेऊया
ही घटना ब्रिटनच्या लंडनमधील आहे. याठिकाणी डेनिएल वाट्स(Danielle Watts) नावाच्या महिलेने खासगी डेंटिस्टकडे जाण्यास पैसे नाहीत म्हणून स्वत:चे ११ दात उखडले आहेत. मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार, महिला तिच्या भागातील सरकारी हॉस्पिटलमध्ये गेली होती. परंतु त्याठिकाणी एकही डेटिंस्ट उपलब्ध नव्हता. दातांमधील वेदना प्रचंड होत्या. त्यात खासगी डेंटिस्टकडे जाण्यासाठी पैसे नव्हते. त्यासाठी तिने एक एक करून स्वत:चे ११ दात उखडून काढले.
डेनिएल वाट्सने मागील ३ वर्षापासून दात उखडून टाकत आहे. खासगी डेंटिस्टचे पैसे भरण्यासाठी फी नाही. त्यामुळे मजबुरीनं मलाच दात काढावे लागले. मी हसणं सोडून दिलं आहे. माझा आत्मविश्वास ढासळला आहे. वेदनेमुळे मला प्रत्येक दिवशी पेनकिलरचं औषध घ्यावं लागतं असं डेनिएल म्हणाली. स्वत:चे दात उखडून टाकणं खूप त्रासदायक आहे. परंतु माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता असं तिने सांगितले. दातांमध्ये समस्या होती, काही दात हलत होते. मी घराजवळील सरकारी आरोग्य केंद्रात गेले परंतु ते ६ वर्षापूर्वीच बंद झालं होतं. जवळपास कुठलाही डेंटिस्ट नव्हता. सर्वांनी खासगी डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला दिला परंतु त्याचा खर्च देणं मला परवडणारं नव्हतं असं डेनिएलने सांगितले.