याला म्हणतात नशीब! काही तासात मजूर झाला करोडपती; 40 रुपये उधार घेऊन केलेलं 'हे' काम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 12:11 PM2023-10-03T12:11:53+5:302023-10-03T12:13:27+5:30
भास्कर माजी हे इतरांच्या शेतात मजुरी करून आणि बकऱ्या पाळून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गेल्या दहा वर्षांपासून ते लॉटरीचं तिकीट खरेदी करत होते.
पश्चिम बंगालच्या पूर्व बर्दवानमधून एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. जिथे एक मजूर काही तासात करोडपती झाला. हा मजूर बकऱ्यांसाठी चारा आणण्यासाठी गेला होता आणि घरी परतल्यावर त्याला कळलं की तो आता करोडपती झाला आहे. ही बातमी गावात पसरताच जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आणि लोक त्याचे अभिनंदन करण्यासाठी घरी येऊ लागले.
मंगळकोटमधील खुरतुबापूर गावात ही घटना घडली. येथे राहणारे भास्कर माजी हे इतरांच्या शेतात मजुरी करून आणि बकऱ्या पाळून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गेल्या दहा वर्षांपासून ते लॉटरीचं तिकीट खरेदी करत होते. एक दिवस त्यांचे हे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल या आशेने ते तिकीट घ्यायचे. रविवारी सकाळी त्यांनी 40 रुपये उधार घेऊन लॉटरीचं तिकीट घेतलं आणि दुपारी ते करोडपती झाले.
40 रुपये उसने घेतले
मजूर भास्कर माजी यांनी सांगितले की, रविवारी ते नपारा बसस्थानकाजवळ चारा कापण्यासाठी आले होते. पण लॉटरीचं तिकीट घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यांनी ओळखीच्या एकाकडून 40 रुपये उसने घेतले, त्यानंतर लॉटरी काउंटरवरून 60 रुपयांना तिकीट नंबर 95H83529 विकत घेतलं. दुपारी त्यांना लॉटरीत पहिलं बक्षीस मिळाल्याचं समजलं. हे कळल्यावर त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
लॉटरीचे तिकीट विक्रेते मौलिक सेख मामेजुल यांनी सांगितले की, रविवारी दुपारी 1.20 वाजता त्यांना कळले की गावातील भास्कर माजी यांनी 1 कोटी रुपयांचे पहिले बक्षीस जिंकले आहे. गेल्या 10 वर्षांपासून ते परिसरात लॉटरी काउंटर लावत आहेत. एक गरीब मजूर त्यांच्या दुकानातून खरेदी केलेल्या लॉटरीच्या तिकिटाने करोडपती झाला याचा त्यांना आनंद आहे.
मुलींच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज फेडणार
1 कोटींची लॉटरी जिंकलेले मजूर भास्कर माजी म्हणाले की, त्यांचं घर मातीचं आहे. पावसाळ्यात पाणी गळतं. या पैशातून आम्ही घर बांधू आणि आमच्या मुलींच्या लग्नासाठी घेतलेलं कर्ज फेडू. शेतीसाठी काही जमीनही खरेदी करणार आहे. भास्कर यांच्या मुलींनी सांगितलं की, वडिलांनी मोठ्या कष्टाने आम्हाला बीए पास केलं आणि कर्ज काढून लग्न केलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.