जगातला सर्वांत छोटा व्यावसायिक चित्रकार; लियामच्या चित्रांना जगभरात पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 06:20 AM2024-07-04T06:20:19+5:302024-07-04T06:20:52+5:30

लियामच्या आईचे नाव चँटेल कुकुवा एगहान. ती प्रसिद्ध चित्रकार. लियाम फक्त सहा महिन्यांचा होता तेव्हा ‘मिस युनिव्हर्स-२०२३’साठी तिच्याकडे एक प्रोजेक्टच्या कामाची गडबड होती.

World Smallest Professional Painter; Liam paintings are loved around the world | जगातला सर्वांत छोटा व्यावसायिक चित्रकार; लियामच्या चित्रांना जगभरात पसंती

जगातला सर्वांत छोटा व्यावसायिक चित्रकार; लियामच्या चित्रांना जगभरात पसंती

‘तो’ दीड वर्षाचा चिमुकला. रंग, ब्रश, कोरा कॅनव्हास, असं साहित्य घेऊन एकाहून एक सरस चित्र काढतो, रंगवतो. त्याच्या चित्रातली रंगसंगती पहिली तर आश्चर्याने थक्क व्हायला होते.  त्याने काढलेल्या १० चित्रांपैकी ९ चित्रं चित्रप्रदर्शनात हातोहात विकली गेली. आज तो सर्वांत कमी वयाचा; पण चित्र, रंग याची जाण असलेला चित्रकार म्हणून ओळखला जातो. विश्वविक्रमात तशी नोंद असलेला बालक ठरला आहे. 

एस लियाम नाना स्याम अंक्राह, असं या चिमुकल्या चित्रकाराचं नाव आहे. तो आफ्रिका देशातील घाना येथील रहिवासी. तो सहा महिन्यांचा होता तेव्हापासून रंग आणि ब्रश त्याच्या हातात आले.  तो चित्र काढायला लागला. महत्त्वाचं म्हणजे चित्रकलेची तो फक्त बाराखडीच गिरवत होता अगदी तेव्हापासून लियामच्या चित्रांकडे लोकांचं लक्ष गेलं. हा तर  मोठ्या माणसांसारखा पेंटिंग करतो आहे, हे पाहणाऱ्यांना तत्काळ जाणवू लागले होते. खरंतर लियाम हा एकल आईचा मुलगा. आई चित्रकार. आपल्या कामात मुलाने लुडबुड करू नये म्हणून तिनेच त्याच्या हातात रंग आणि ब्रश दिले. तो काहीतरी चिरखोड्या करत राहील आणि आपण आपले काम शांतपणे करू असं तिला वाटे.  आईच्या शेजारी बसूनच लियाम चित्र काढायचा. रंगकाम करायचा;  पण लियाम इतक्या कमी काळात एवढी प्रगती करेन याची त्याच्या आईलाही कल्पनाही नव्हती, अपेक्षा तर नव्हतीच नव्हती. आज आईपेक्षाही लीयामच्या चित्रांना जास्त मागणी आहे. गिनीज वर्ल्ड रेकाॅर्डसमध्ये जगातला सर्वांत कमी वयाचा चित्रकार अशी त्याची नाेंद झाली आहे.

लियामच्या आईचे नाव चँटेल कुकुवा एगहान. ती प्रसिद्ध चित्रकार. लियाम फक्त सहा महिन्यांचा होता तेव्हा ‘मिस युनिव्हर्स-२०२३’साठी तिच्याकडे एक प्रोजेक्टच्या कामाची गडबड होती. तिला ते चित्र लवकरात लवकर पूर्ण करून द्यायचे होते. छोट्या लियामने चित्र काढताना मध्ये-मध्ये करून गडबड करू नये, आपल्याला काम करू द्यावे, यासाठी चँटेलला त्याला कशाततरी गुंतवून ठेवावसं वाटलं. लियाम चित्र पाहण्यात जसा दंग होतो तसा तो चित्र काढण्यातही दंग होऊ शकतो, असा विचार तिच्या मनात आला. तिने त्यासाठी लियामला कॅनव्हास आणि रंग  आणून दिले आणि या गोष्टींच्या सानिध्यात लियामला खेळायला सोडून दिले.

लियाम त्याला दिलेल्या साहित्यात खूश व्हायचा. या साहित्याशी खेळता खेळता त्याचे हात कॅनव्हासवर चालू लागले. तो कॅनव्हासवर रंग ओतून त्यात लोळायचा, रांगायचा. आपलं काम संपल्यावर चँटेल लियाम त्याला दिलेल्या कॅनव्हासवर काय करतो, हे बारकाईने पाहायची. हळूहळू लियामने कॅनव्हासवर साधलेला आविष्कार साधा आणि दुर्लक्ष करता येण्यासारखा नाही, हे तिच्या लक्षात यायला लागलं.  विविध रंगांचा मुक्त वापर करून लियामने सुंदर कलाकृती तयार केलेली होती. त्याच्या चित्रातली ती रंगसंगती पाहणाऱ्याला थक्क करायला लावणारी होती.  हे चित्र म्हणजे टाइमपास नसून ती कलाकृती झाली आहे, याची जाणीव चँटेलला झाली. तिने त्या  पेंटिंगला ‘द क्राउल’ असे नाव दिले आणि घरात बाजूला ठेवून दिले.  लियामला रंगामध्ये मजा येते याची जाणीव चँटेलला झाली. लियामच्या आजूबाजूला सतत रंग असतील याची तजवीज चँटेल करू लागली.

लियाम आज फक्त पावणे दोन वर्षांचा आहे. घानाची राजधानी आक्रा येथील विज्ञान आणि तंत्रज्ञान संग्रहालयात लियामच्या चित्रांचं प्रदर्शन दोन महिने चाललं. घानाची प्रथम नागरिक लेडी रिबेका अकूफो अयाडो यांनी देखील या प्रदर्शनाला भेट दिली. लियामच्या चित्रांचे कौतुक केलं. आपला मुलगा अजून लहान आहे; पण तो मोठेपणी जेव्हा जाणीवपूर्वक कलेच्या क्षेत्रात पाऊल टाकेल तेव्हा  या क्षेत्रात तो त्याने काढलेल्या चित्रांनी एक वादळ आणेल. आपल्या मुलाला कलेच्या क्षेत्रातील चांगली स्काॅलरशिप मिळाली तर तोही लवकरच जगातील विख्यात चित्रकारांच्या पंक्तीत बसेल, असा विश्वास एक आई आणि एक चित्रकार म्हणून चँटेलला वाटतो आहे.

लियामच्या चित्रांना जगभरात पसंती
व्यावसायिक चित्रप्रदर्शनामध्ये भाग घेणे आणि चित्र विकणे, या उपक्रमात लियामने काढलेली १५ चित्रं विकली गेली. लियामची रंगांची समज आणि त्याने काढलेल्या चित्रांना असलेली मागणी आणि लोकांची पसंती बघता लियामला जगातला सर्वात लहान वयाचा चित्रकार हा किताब दिला गेला. गिनीज वर्ल्ड रेकाॅर्डची याबाबतची मेल जेव्हा चँटेलला आली तेव्हा तिला सुखद धक्काच बसला. डोळ्यांना पाण्याच्या धारा लागल्या. एवढ्या कमी वयात लियामला मिळालेलं असामान्यत्व बघता लियाम भविष्यातला मोठा कलाकार होणार याचा विश्वास त्याच्या आईसोबतच त्याच्या चाहत्यांनाही वाटतो आहे.

Web Title: World Smallest Professional Painter; Liam paintings are loved around the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.