जगातील सर्वात महाग बर्गर; किंमत आहे केवळ 63 हजार रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 07:24 PM2019-04-02T19:24:34+5:302019-04-02T19:25:07+5:30
दुकानाचा दर्जा आणि ब्रँड विचारात घेतला तरी बर्गरची किंमत जास्तीत जास्त एक हजार रुपयाच्या वर असणार नाही. पण तुम्ही कधी 63 हजार रुपयांच्या बर्गरविषयी ऐकले आहे का?
टोकियो - हल्लीच्या फास्टफूडच्या जमान्यात पिझ्झा, बर्गर हे अनेकांचा आवडते खाद्यपदार्थ बनले आहेत. तुम्ही विविध ठिकाणी बर्गरची चव चाखली असेलच. पण एका दर्जेदार बर्गरसाठी तुम्ही किती रुपये मोजू शकता? 300, 400 की 600 रुपये? दुकानाचा दर्जा आणि ब्रँड विचारात घेतला तरी बर्गरची किंमत जास्तीत जास्त एक हजार रुपयाच्या वर असणार नाही. पण तुम्ही कधी 63 हजार रुपयांच्या बर्गरविषयी ऐकले आहे का? नाही ना! ही आहे जगातील सर्वात महाग बर्गरची किंमत. ऐकून धक्का बसला ना. पण हे खरे आहे. एवढा महाग बर्गर जपानमध्ये बनवण्यात आला आहे.
पॅट्रिक सिमाडा याने हा सर्वात महाग बर्गर बनवला आहे. या बर्गरचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला सोन्याच्या कणांचा मुलामा देण्यात आलेला आहे. सध्या हा बर्गर टोकियोमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. तसेच महागडे खाणे खाण्याची हौस असणाऱ्यांसाठी हा बर्गर जून महिन्यापर्यंत उपलब्ध असणार आहे.
हा बर्गर बनवण्यासाठी ओक किलो वायगो बीफ पॅटी, फॉई ग्रास, सलाड, चेद्दार चीझ, टोमॅटो आणि कांदे अशा पदार्थांचा वापर करण्यात आला आहे. तसेच या बर्गरचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यासाठी वापरण्यात आलेल्या पावाला सोनेरी चुऱ्याचा वर्ख देण्यात आला आहे.
जपानचे नवे सम्राट राजकुमार नरुहितो यांच्या राज्याभिषेकाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी हा महागडा बर्गर बनवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. जपानमध्ये काम करत असताना शाही युगाच्या परिवर्तनाचा साक्षीदार होण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य समजतो, असे हा बर्गर तयार करणारे शेफ पॅट्रिक यांनी सांगितले.