130 कोटी रूपयांचा गुलाब, खरेदी करण्यासाठी असावं लागतं कोट्याधीश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 01:32 PM2023-08-08T13:32:53+5:302023-08-08T13:36:39+5:30
Juliet Rose : हे गुलाबाचं एक फूल खरेदी करण्यासाठी तुम्ही कोट्याधीश असणं गरजेचं आहे. जर तुम्ही कोट्याधीश नसाल तर तुम्ही हे फूल खरेदी करण्याचं स्वप्नही बघू शकत नाही.
Juliet Rose : पावसाळ्यात सगळीकडे हिरवागार नजारा बघायला मिळतो. झाडांना नव्या पालव्या आणि फुलं येतात. वेगवेगळ्या रानटी प्रजातीची फुलं उमलतात. सामान्यपणे तुम्ही अनेक प्रकारची फुलं पाहिली असतील. लाल, पांढरे, गुलाबी, काळे आणि इतरही काही. पण आज आम्ही तुम्हाला अशा गुबालाबाबत सांगणार आहोत, ज्याबाबत कदाचित तुम्ही ऐकलंही नसेल. हे गुलाबाचं एक फूल खरेदी करण्यासाठी तुम्ही कोट्याधीश असणं गरजेचं आहे. जर तुम्ही कोट्याधीश नसाल तर तुम्ही हे फूल खरेदी करण्याचं स्वप्नही बघू शकत नाही.
आम्ही तुम्हाला सांगतोय जूलिएट रोजबाबत. या गुलाबाची किंमत हिऱ्यांपेक्षाही जास्त आहे. चला जाणून घेऊ हा गुलाब इतका का खास आहे? आश्चर्याची बाब म्हणजे हा गुलाब उगवण्यासाठी 15 वर्षांचा कालावधी लागतो. हा जगातला सगळ्यात महाग गुलाब आहे.
हा गुलाब दिसायला खूप सुंदर आणि याच्या सुगंधाबाबत विचाराल तर सगळं काही विसराल. या सुगंध असा असतो की, तुमचा बिघडलेला मूड काही सेकंदात चांगला होईल. जूलिएट रोज आपल्या खासियतमुळे जगभरात फेमस आहे.
फायनान्स ऑनलाइनच्या एका रिपोर्टनुसार, जूलिएट रोजची किंमत 130 कोटी रूपये आहे. याची किंमत इतकी असण्याचं कारण म्हणजे हे इतर गुलाबांसारखे सहजपणे उगवत नाहीत. ही फुलं उगवण्यासाठी खूप जास्त मेहनत घ्यावी लागते. सगळ्यात आधी 2006 मध्ये जूलिएट रोज उगवण्यात आले होते. हे उगवण्यात डेविड ऑस्टिन नावाच्या व्यक्तीचा हात होता. अनेक प्रयोगांनंतर त्याने हे बहुमूल्य गुलाबाचं फूल उगवलं होतं.
15 वर्षात एकदाच फुलतो हा गुलाब
जूलिएट गुलाब उगवण्यासाठी 15 वर्षांचा कालावधी लागतो. इतके वर्ष याच्या झाडांची काळजी घेतली जाते. तेव्हा कुठे फुलं फुलतात. टाइम्सनाउच्या एका वृत्तानुसार, अनेक प्रकारच्या गुलाबांच्या प्रजाती मिक्स करून जूलिएट गुलाब बनवण्यात आला आहे. यामुळे तो महागडा आहे आणि या कारणाने याचं नाव जूलिएट ठेवलं आहे. 2006 मध्ये पहिल्यांदा उगवला गेल्यावर याची किंमत 90 कोटी रूपये होती. पण आता याची किंमत 130 कोटी रूपये झाली आहे.