जगातला सगळ्यात महागडा आंबा माहित्येय का? १ किलो घ्यायलाही फुटेल घाम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 05:31 PM2020-05-28T17:31:40+5:302020-05-28T17:38:24+5:30
जगभरातील सगळ्यात जास्त भारतीय लोक आंबा खातात.
आंबा खायला सगळ्यांनाच आवडतं. वाढत्या उन्हाळ्यात मनाला आनंद देणारा आंबा असतो. तोंडाला पाणी सुटलं ना? उन्हाळ्यात असं एकही घर नसेल जिथे आंबे खाल्ले जात नाहीत. आंब्याला फळांचा राजा असं म्हटलं जातं. हापूस, पायरी, तोतापूरी, लंगडा असे अनेक आंब्याचे प्रकार आहेत. जगभरातील सगळ्यात जास्त भारतीय लोक आंबा खातात. पण तुमचा विश्वास बसणार नाही. जगातील सगळ्यात महागडा आंबा भारतात मिळत नाही. तसंच या आंब्याची किंमत ऐकूनच अनेक लोकांना सुद्धा घाम फुटतो. चला तर मग जाणून घेऊया या आंब्याबाबत.
ताईयो नो तामागो (एग ऑफ द सन) असा एक आंब्यांचा प्रकार आहे. हा आंबा जपानच्या मियाजाकी प्रांतात पिकवला जातो. तसंच संपूर्ण जपानमध्ये विकला सुद्धा जातो. दरवर्षी खास आणि सगळ्यात आधी पिकवलेल्या आंब्यांची बोली लावून लिलाव केला जातो. त्यामुळे या आंब्याचे भाव गगनाला भिडतात.
या आंब्याची शेती इतर पिंकाप्रमाणे कधीही करता येत नाही. फक्त ऑर्डर असेल तरच या पिकांची शेती केली जाते. या आंब्याचं वेगळेपणं असं आहे की हा आंबा अर्धा लाल आणि अर्धा पिवळा असतो. जपानमध्ये हिवाळा आणि उन्हाळ्यात या आंब्याचं पीक घेतलं जातं. हे आंबे खूप महाग असतात.
२०१७ मध्ये या आंब्याच्या एका जोडीसाठी बोली लावण्यात आली होती. त्यावेळी ही जोडी ३ हजार ६०० डॉलर म्हणजे ७२ हजार रुपयांना विकली होती. प्रत्येक आंब्याचं वजन ३५० ग्राम होतं. तुम्ही विचारात पडला असाल की, ७०० ग्राम आंब्याची किंमत एव्हढी जास्त कशी, हेच एक किलो आंबे विकत घेण्यासाठी तुम्हाला तीन लाखांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतील.
हे आंबे पिकवत असताना खूप खबरदारी घेतली जाते. शेतकरी आंब्यांना बाहेरून जाळे लावून ठेवतात. शेतकरी या आंब्यांना पिकल्यानंतर खाली पडू देत नाहीत. जाळी लावल्यामुळे आंबे जाळीत पडतात. हे आंबे खूप चविष्ट आणि रसदार असल्याचे स्थानिक लोक सांगतात.
ज्योती कुमारी होणार 'सुपर 30' ची विद्यार्थीनी; मोफत शिक्षण देणार
बापरे! याने हव्यासापोटी शेजाऱ्यांच्या १२६ चपला चोरल्या; कारण वाचाल तर हैराण व्हाल