तुमच्या स्मार्टफोनमध्ये आहे १००% शुद्ध सोने; ऐकून आश्चर्य होईल पण हे खरे आहे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 09:46 AM2023-02-22T09:46:02+5:302023-02-22T09:46:25+5:30
सोने हा धातू विजेचा उत्तम वाहक असल्याने मुख्यत्वे त्याचा वापर मोबाइलच्या मदरबोर्डमध्ये केला जातो. हे सोने १०० टक्के शुद्ध असते.
स्मार्टफोनची हौसच न्यारी. कुणाकुणाकडे तर दोन-दोन स्मार्टफोन असतात. प्रत्येकासाठी स्मार्टफोन अगदी सोन्यासारखा! पण कुणी सांगितले की तुमच्या फोनमध्ये १०० टक्के शुद्ध सोने आहे, तर खरे वाटेल? हो, हे खरे आहे. फोनमध्ये सोनेच काय तर चांदीही असते. मोबाइल बनविताना त्यात अनेक लहान-लहान वस्तू, सर्किट, चीप, कंडक्टर्स आदींचा वापर होतो. वीज वाहून नेण्यासाठी त्यात कंडक्टर (वाहक) वापरले जातात. सोने हा धातू विजेचा उत्तम वाहक असल्याने मुख्यत्वे त्याचा वापर मोबाइलच्या मदरबोर्डमध्ये केला जातो. हे सोने १०० टक्के शुद्ध असते.
नेमके किती सोने असते?
यूएस जिओलॉजिकल सर्व्हेच्या अहवालानुसार जवळपास ४१ मोबाइलमधील सोने एकत्र केल्यास ते १ ग्रॅम इतके भरेल. सोन्याइतकीच चांदीही फोनमध्ये वापरलेली असते. फोनमधील विविध कनेक्शन्स जोडण्यासाठी तांब्याचा वापर केलेला असतो.
सोने काढता येणार काय?
सध्या सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे मोबाइलमधील सोने काढता आले तर, असा विचार कुणाच्याही मनात येऊ शकतो. परंतु हे सोने काढणे शक्य नाही. मोबाइलमध्ये सोने नेमके कुठे आहे, हे शोधणे सर्वात कठीण आहे. एखादा हार्डवेअर इंजिनीअरच हे करू शकेल. सोने काढणे केवळ अशक्य आहे. ते काढायला गेल्यास फायदा नव्हे नुकसान होण्याचीच शक्यता जास्त आहे.
सोन्याची किंमत किती?
सोन्याच्या एकूण प्रमाणाचा विचार केला तर एका मोबाइलमध्ये ०.०३ ग्रॅम इतके सोने असते. बाजारभावानुसार या सोन्याची किंमत अंदाजे
१०० ते १५० रुपये इतकी असते. इतक्याच प्रमाणात असलेली चांदी काही रुपयांची असते.